वर्चस्वासाठी बहीण-भावातच संघर्ष; विधानसभेची तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:13 AM2019-04-14T00:13:43+5:302019-04-14T00:17:00+5:30
या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
संजय खाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून मताधिक्य मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाचा बालेकिल्ला या लोकसभा निवडणुकीतही अभेद्य राहण्यासाठी भाजपाने व्यूहरचना आखली आहे तर परळी विधानसभा मतदार संघात आपले वर्चस्व राहण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत व पोटनिवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात भाजपाला मताधिक्य प्राप्त झालेले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत डॉ.प्रीतम मुंडे यांनाही मताधिक्य मिळाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनाही भरघोस मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे विरूध्द धनंजय मुंडे अशी बहीण-भावात लढत झाली होती.
या लढतीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात भाजपाचा हा बालेकिल्ला पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत ढासळू दिला नाही. मात्र त्यानंतर झालेल्या नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीत मात्र धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला.