एसटीचे ‘सीमोल्लंघन;’ प्रवासी नसल्याने तोटा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:45+5:302021-07-10T04:23:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे अनेक दिवस बंद असलेली एसटीची दौड आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे अनेक दिवस बंद असलेली एसटीची दौड आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली असून, प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अजूनही बीड एस.टी. तोट्यात आहे. मुश्किलीने डिझेलचे पैसे निघत आहेत. तरीदेखील एस.टी. महामंडळाकडून सेवा जवळपास सर्व ठिकाणी सुरू ठेवलेली आहे.
जिल्ह्यातून ग्रामीण भागात तसेच परजिल्ह्यांत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसफेऱ्या प्रवासी संख्येनुसार बदलल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे त्यामुळे अनेक राज्यांत जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला होता. अद्यापदेखील चार वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याचा फटकाही बस प्रवाशांना बसत आहे. परराज्यांत जाणाऱ्या बसची संख्या फक्त एक आहे. ही बस अंबाजोगाई ते हैदराबाद अशी जाते. दरम्यान, मुंबई-पुणे व औरंगाबाद या शहरांत जाण्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मात्र, गैरसोय होत असून, खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. एस.टी.ला या काळात तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गरजेनुसार बसफेऱ्या सुरू असल्याचे बीड विभागाकडून सांगण्यात आले.
...
विभाग तोट्यातच
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात पुन्हा दुपारी चार वाजल्यानंतर संचारबंदीचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहेत. प्रवासी घटल्याने सर्वच आगारांतील एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा एस.टी. महामंडळाला आहे.
...
बीड-पुणे-मुंबई फेऱ्या वाढल्या
लॉकडाऊन उघडल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, मुंबई व पुणे या ठिकाणी कामानिमित्त असलेला मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांचादेखील या मार्गावर चांगला प्रतिसाद आहे.
......
औरंगाबाद येथे जाणाऱ्यांची संख्याही चांगली असल्यामुळे दोन्ही शहरांतून विनावाहक बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या फेऱ्या प्रवासी संख्येनुसार कमी-जास्त केल्या जात आहेत.
प्रवासीसंख्या कमी असल्याने शिवशाही बस बंद ठेवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे. तर, प्रवासी संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
...
परराज्यांत फक्त एक बस
कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश यांसह इतर राज्यांत बससेवा सुरू होती. दरम्यान प्रवासी नसल्याने फक्त अंबाजोगाई ते हैदराबाद ही एकच परराज्यांतील बस सुरू आहे. तिलादेखील म्हणावा तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. पुढील काळात पूर्वपदावर परिस्थिती आल्यानंतर सर्व राज्यांतील बससेवा सुरळीत करण्यात येणार आहे.
....
जिल्ह्यातील एकूण आगारे -०८
आगारातील एकूण बसेस - ५४८
सध्या सुरू असलेल्या बसेस - ३९८
रोज एकूण फेऱ्या ४१०
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस ०१