शैक्षणिक खर्चास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:56 PM2019-07-23T16:56:05+5:302019-07-23T17:00:44+5:30
शैक्षणिक खर्चाचा भार व कुंटूंबाची हलाखीची परिस्थिती यातून आत्महत्या
धारूर (बीड) : तालूक्यातील मोहखेड येथील रहिवासी असलेला पदवीचे शिक्षण घेत असलेल्या योगेश किसन राठोड (20) याने शैक्षणिक खर्चास पैसे मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेतून मंगळवारी (दि.23) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. तो अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयात कला शाखेत पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
योगेश राठोड हा आज पहाटे मोहखेद येथील घरातून बाहेर पडला. काही दिवसांपासून शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने तो विवंचनेत होता. यातूनच त्याने मोहखेड शिवरात पहाटे गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राठोड कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. कोरडवाहू शेती करून योगेशचे आई-वडील दोन मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत होते. योगेशचा लहान भाऊ सुद्धा अंबाजोगाई येथेच महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शैक्षणिक खर्चाचा भार व कुंटूंबाची हलाखीची परिस्थिती यामुळे योगेशने आत्महत्या करून जिवन संपवल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे