बीड येथील महिला महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:57 PM2018-10-25T23:57:54+5:302018-10-25T23:58:29+5:30
येथील महिला महाविद्यालयात परीक्षेस उशिर झाल्याने प्राचार्यांनी प्रवेश नाकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील महिला महाविद्यालयात परीक्षेस उशिर झाल्याने प्राचार्यांनी प्रवेश नाकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तरीही प्राचार्यांनी त्यांना आत प्रवेश दिला नाही. सदरील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची विद्यापिठाकडे तक्रार केल्याचे समजते. प्राचार्यांनी मात्र आपण विद्यापीठाच्या आदेशापालिकडे काहीच केले नसल्याचा खुलासा केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत सध्या पदवी परीक्षा घेतल्या जात आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता वेगवेगळ्या विषयाची परीक्षा होती. बीडमधील महिला महाविद्यालयाही केंद्र आहे. याच महाविद्यालयात काही परीक्षार्थी १०.३० नंतर केंद्रावर आले. यावेळी प्राचार्य सविता शेटे यांनी त्यांना प्रवेश नाकारला. विद्यार्थ्यांनी विनंती केली. मात्र तरीही आपण विद्यापीठाच्या नियमापलिकडे जावून काम करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर गोंधळ शांत झाला. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तुच्छ वागणूक, वारंवार अडथळा आणणे, ओरडणे यासारख्या प्रकारामुळे पेपर सोडविणे अवघड होत असल्याची तक्रार करून परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. उशिरा आलेल्या एकाही विद्यार्थ्याला शेवटपर्यंत आत प्रवेश दिला नव्हता. काही प्राचार्यांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे नुकसान करु नये असे त्यांचे म्हणणे होते.