विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:14+5:302021-08-01T04:31:14+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे मोबाइलची रेंज गुल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे परिसरातील ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे मोबाइलची रेंज गुल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस हे गाव तसे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या गावात माध्यमिक शाळा असून इतर पदव्यांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेली दीड वर्षापासून सर्व शिक्षण हे ऑनलाइन झाल्यामुळे मोबाइल नेटवर्कला मोठे महत्त्व आले आहे. शिवाय सुशिक्षित व तरुण वर्ग आता सर्व कामे मोबाइलवरून करण्यास अधिक पसंती देत आहे. अशा परिस्थितीत मोबाइल नेटवर्क असणे खूप महत्त्वाचे आहे.
पूस या गावात गेली अनेक दिवसांपासून मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे गावातील लोकांना कॉल करणे, कॉल घेणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तर शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पूस गावात या तीन कंपनीचे सामूहिक टॉवर आहेत. मागील एक वर्षापासून या तीनही कंपन्यांच्या मोबाइलला घरात, बाहेर कुठेच रेंज येत नाही. याबाबत गावातील अनेक मोबाइल वापरकर्त्यांनी ऑनलाइन तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या कंपन्यांवर योग्य रेंज देणे हे बंधनकारक असतानाही गावातील मोबाइल वापरकर्त्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. या तीनही कंपन्यांनी लवकरात लवकर मोबाइलची रेंज सुरळीत करावी, अन्यथा या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.