खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:10 AM2018-07-05T00:10:27+5:302018-07-05T00:11:20+5:30
बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी त्यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी त्यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना केल्या.
शासनातर्फे एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना गणवेश दिला जातो. परंतु खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश नियमानुसार मिळत नसल्यामुळे या मुलांचे चेहरे हिरमुसले व्हायचे. त्यांचे हे वय अल्लड असल्यामुळे आपल्याला गणवेश मिळाला नाही याची खंत त्यांच्या मनावर कोरली जायची. बाल मनावर त्यांच्या शैक्षणिक आयुष्याच्या सुरुवातीपासूनच असले प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वांनाच गणवेश कसे मिळतील या संदर्भात आढावा घेतला असता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६५ हजाराच्या जवळपास आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला तरी हा खर्च दोन कोटी रुपयांच्या जवळपास जातो. लहान मुलांच्या भावनांचा विचार केला तर त्या तुलनेत ही रक्कम फार काही मोठी नाही. लोकसहभागातून हे कार्य जर पार पाडले तर कोणावरही बोजा पडणार नाही, असे सभापती राजेसाहेब देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बुधवारी जिल्हा परिषदेत बैठकीस शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, सर्व शिक्षा अभियानचे हिरालाल कराड, जिल्ह्यातील सर्व बीईओ, कर्मचारी उपस्थित होते. जि.प. शाळेत शिक्षण घेणारी मुले ही सर्वसाधारणपणे गरीब, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील असतात. ज्या विद्यार्थ्यांना तालुक्यावर जाऊन शिक्षण घेता येत नाही ती सर्व मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात. गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य घेण्याची त्यांच्या पालकांची आर्थिक कुवत नसते. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून गणवेश देण्याचा आम्ही राज्यात सर्वप्रथम बीड जिल्ह्यात प्रयोग करीत आहोत. सर्व देवस्थान ट्रस्ट, रोटरी, लायन्स, विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी, सेवाभावी संस्थांना विद्यार्थ्यांच्या या गणवेशाचा भार उचलण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. तसेच वाढदिवसासारख्या उपक्रमाचा खर्च टाळून त्यातून या विद्यार्थ्यांना गणवेश दिले तर हा प्रश्न सहज सुटू शकतो, असे ते म्हणाले.