बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 07:03 PM2017-12-13T19:03:53+5:302017-12-13T19:11:01+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
कडा (बीड ) : गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आष्टी तालुक्यातील कडा या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असल्याने तालुक्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घरातून सकाळी सात वाजता बस थांब्यावर येऊन उभा राहावे लागते. मग येणाºया बसमध्ये बसून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे आणि चार वाजता पुन्हा बसस्थानकात येऊन उपाशीपोटी उभा राहत आॅर्डिनरी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. या सा-या गोष्टींमुळे घरी जायला उशीर होऊन म्हणून अभ्यास करायला वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरातच अभ्यास करावा लागत आहे. ही परिस्थिती एक दिवसापुरतीच नव्हे तर वर्षानुवर्ष दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहून अवेळी सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
आम्ही खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो; पण शाळेतून घरी येईपर्यंत आई, वडील काळजी करतात; परंतु बस वेळेवर येत नसल्याने वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे उंदरखेल येथील दहावीच्या रूपाली शेकडे, वृषाली वामन यांनी सांगितले. बस वेळेवर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. तसेच तहान- भूक विसरुन बससाठी ताटकळावे लागते. शिक्षणासाठी येणा-या ग्रामीण विद्यार्थ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे.
लवकरच सुरळीत होईल
सध्या शाळेच्या शैक्षणिक सहली जात असल्याने बसेस वेळेवर उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी केली असून, लवकरच सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आष्टी आगार प्रमुख राजेंद्र दिवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
परिवहन मंत्र्यांना निवेदन देणार
अनेक ठिकाणी शाळेतून घरी जाताना उशीर झाल्याने विद्यार्थिनींवर वाईटप्रसंग ओढवल्याच्या घटना घडल्या असताना देखील यातून कसलाच धडा न घेता एस.टी. महामंडळाला कसलेच गांभीर्य नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर आली आहे. आष्टी आगाराने अवेळी सुटणा-या बसेस किमान वेळेवर तरी सोडाव्यात यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देणार असल्याचे कडा येथील सरपंच दीपमाला ढोबळे यांनी सांगितले.