लग्नास नकार दिल्याने सोनवळा येथे अल्पवयीन मुलीस पेटविले, सर्व आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 02:13 PM2017-12-29T14:13:56+5:302017-12-29T14:25:06+5:30
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.
अंबाजोगाई (बीड) : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेत सदरील युवती गंभीर भाजली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रज्ञा ऊर्फे सोनाली सतिश मस्के (वय १७, रा. सोनवळा) असे या पिडीत युवतीचे नाव आहे. ती सध्या लोखंडी सावरगाव येथील महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे. तिने जबाबात सांगितल्यानुसार, तिचे आई वडील सध्या कुंद्री येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ती सध्या आजी आणि दोन भावांसह सोनवळा येथेच स्वतःच्या घरी राहते. मागील आठवड्यात गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाला लग्नासाठी मागणी घातली होती, परंतु तिने त्यास नकार दिला होता.
मंगळवार (दि. २६) तिची आजी लाईट बिल भरण्यासाठी अंबाजोगाई येथे गेली होती. एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के हे चौघेजण तिच्या घरी आले. यावेळी महादेव ने प्रज्ञास माझ्याशी लग्न करणार आहेस का असे विचारले. यावर प्रज्ञाने माझे वडील आणि चुलते यासाठी नाहीच म्हणणार आहेत आणि मी देखील तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे सांगितले.
यावर बबन व कविता या दोघांनी घरात घुसून प्रज्ञाचे दोन्ही हात पकडले व महादेव ने जवळच ठेवलेला डब्ब्यामधील रॉकेल तिच्या अंगावर ओतले. तर सुवर्णा हिने काडी ओढून प्रज्ञाला पेटवून दिले. यानंतर चौघेही आरोपी तिथून पळून गेले. जीवाच्या आकांताने प्रज्ञाने आरडाओरडा केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत पळत आले आणि त्यांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले.या घटनेत प्रज्ञा ६१ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.
काल गुरुवारी तिचा पोलीस उपअधीक्षक यांच्यासमोर फौजदार देवकन्या मैंदाड यांनी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदविला. याप्रकरणी प्रज्ञाच्या जबाबावरून आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के या चौघांवर कलम ३०७, ३४ अन्वये धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. फौजदार घोळे हे पुढील तपास करत आहेत.