जयदत्त क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:55 PM2019-09-09T23:55:16+5:302019-09-09T23:55:47+5:30
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
बीड : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईट आणि परिसरातील गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ईट येथे आरोग्य उपकेंद्र गरजेचे होते. या भागातील ग्रामस्थांच्या आग्रहावरून क्षीरसागर यांनी हे केंद्र मंजूर केल्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.
ईट आणि परिसरातील ७ ते ८ खेडेगावात ग्रामस्थांना आरोग्य सुविधेसाठी पिंपळनेर आणि बीड या ठिकाणी यावे लागत होते. ईट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी या भागातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. या उपकेंद्रामुळे ईटसह जवळपासच्या गावांना आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जा उन्नतीकरण करून चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय करावे, असा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून क्षीरसागर यांच्या माध्यमातून या मागणीसह अनेक मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे यांनी सांगितले आहे.
मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लोकनेते असून त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सत्ताधारी पक्षात आल्यामुळे बीड विधानसभा मतदार संघातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असल्याची चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे.
ईट येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत होती. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले होते. इतरत्र उपचारासाठी घेऊन जाणे अधिक खर्चाचे होते.
बीड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कृती आराखडा बनविला आहे. यापूर्वी विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामे करताना, निधी खेचून आणताना अडचणी येत होत्या. आता सत्ताधारी पक्षात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला आहे.
- जयदत्त क्षीरसागर, रोहयो व फलोत्पादन मंत्री