ग्रामस्थांच्या आंदोलनास यश; आरणवाडी तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:11 PM2021-08-07T17:11:43+5:302021-08-07T17:12:11+5:30
राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाने सांडवा फोडला होता
धारूर : ग्रामस्थांच्या आंदोलनास यश आले असून आरणवाडी साठवण तलावाचा फोडलेला सांडवा बांधण्यास सुरुवात झाली आहे. जनरेट्यामुळे पाटबंधारे विभागाने दहाच दिवसात सांडवा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे. सांडव्याची उंची पूर्ववत करण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. शनिवारी या कामाची प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे.
आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले.
रमेशराव आडसकर यांनी 15 ऑगस्ट पूर्वी सांडवा पूर्ववत न केल्यास शेतकऱ्यांसह साठवण तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा रस्तारोकोत आंदोलनात दिला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने महसुलने दोन्ही विभागाचे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात बैठक झाली. यात पाटंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाचा धोका कमी झाला असून १४ ऑगस्टपूर्वी सांडवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शनिवारी सांडव्याची उंची पूर्ववत करण्याचे काम सुरु झाले.आक्टोबरपर्यंत सांडवा पूर्ववत करता येणार नाही म्हणणाऱ्या पाटबंधारे विभागास बाराच दिवसात तलाव सुरक्षित वाटला आणि उंची वाढविण्याचे काम सुरु झाले.
पाच गावात हरीत क्रांती होणार
या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत होत असल्याने डोंगरात हरीतक्रांती होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. हे आंदोलन कोणाविरूध्द नव्हते नियम व कायद्याने हक्कासाठी होते. हा मोठा विजय आहे अशा भावना सुनिल शिनगारे, बालासाहेब चव्हाण, विजय शिनगारे, सादेक इनामदार यांनी व्यक्त केल्या.