घरातच राहून कुटुंबाचा कोरोनाशी लढा यशस्वी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:55+5:302021-05-12T04:33:55+5:30
संजय खाकरे परळी : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे व त्यांच्या कुटुंबातील तिघांनी घरात राहून कोरोनाला हरविले ...
संजय खाकरे
परळी : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे व त्यांच्या कुटुंबातील तिघांनी घरात राहून कोरोनाला हरविले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार व नियमितपणे सकस आहार तसेच काढा घेऊन केंद्रे कुटुंबीयांतील चौघांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला.
परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्यासह त्यांची पत्नी मीना, मुलगा सूर्यकांत व चंद्रकांत या चौघांना अंगदुखी, ताप अशी लक्षणे दिसून आली. तातडीने त्यांनी अंबाजोगाईच्या दवाखान्यात कोरोनाची चाचणी करून घेतली केली. तपासणीत घरातील चौघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. एकाचवेळी असे ऐकायला मिळाल्यानंतर अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत घाबरून न जाता संजय केंद्रे यांनी त्वरित अंबाजोगाईचे डॉ. अविनाश मुंडे यांच्याशी संपर्क साधून सल्ला घेतला. त्यानंतर घरातच राहून चौघांनी वेळच्या वेळी औषधोपचार सुरू केले. चौघांनी सकारात्मक विचार ठेवत १८ दिवस पुरेशी झोप घेतली. वेळेवर जेवण व पौष्टिक आहार घेतला. गुळवेल काढा घेतला. त्यामुळे चौघे जण कोरोनामुक्त झाले. या परिस्थितीत घरात राहून मित्र व नातेवाइकांच्या अडीअडचणी मोबाइलद्वारे संजय केंद्रे यांनी सोडविल्या.
नागरिकांनी आजार अंगावर न काढता २४ तासांच्या आत डॉक्टरांशी संपर्क करून त्यावर उपचार सुरू करावेत. म्हणजे वेळेत आजार बरा होईल. आम्ही घरातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो. घरात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतली व गुळवेलचा काढा घेतला त्यामुळे आम्ही कोरोनामुक्त झालो. नागरिकांनी न घाबरता वेळेवर उपचार सुरू करावेत.- संजय केंद्रे, गटविकास अधिकारी, परळी वैजनाथ.
डोक्यात नकारात्मक विचार न येऊ देता सकारात्मक विचार ठेवले, काळजी न करता काळजी घेतली. त्याआधारे आम्ही कोरोनाशी लढा दिला. - मीना संजय केंद्रे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर संजय केंद्रे यांनी परळी पंचायत समितीमध्ये दररोज दोन तास येणे सुरू केले आहे. ग्रामस्थांना सोशल डिस्टन्स पाळून व मास्क घालण्याचे आवाहन करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांना सूचित केले. निगेटिव्हची घेतली काळजी
घरातील चौघे पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळ धास्ती भरते. केंद्रे यांचे वडील नारायण केंद्रे (वय ८२) यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने पुरेशी काळजी घेत शेतातील घरात केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई येथे ठेवले. त्यामुळे त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यातही यश आले.
===Photopath===
100521\151510_2_bed_17_10052021_14.jpeg
===Caption===
घरातच राहून कुटुंबाचा कोरोनाशी लढा यशस्वी