धर्मापुरीची आदर्श ग्रामकडे यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:50+5:302021-03-01T04:37:50+5:30
परळी : तालुक्यातील सर्वात मोठे ग्राम असलेल्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांची पार्श्वभूमी ठरलेल्या श्रीक्षेत्र धर्मापुरी येथे विविध ग्रामविकास योजनांच्या ...
परळी : तालुक्यातील सर्वात मोठे ग्राम असलेल्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांची पार्श्वभूमी ठरलेल्या श्रीक्षेत्र धर्मापुरी येथे विविध ग्रामविकास योजनांच्या माध्यमातून विकास कामांनी जोर धरला असून आदर्श ग्रामकडे वाटचाल सुरू आहे.
अंबाजोगाई-अहमदपूर राज्यमार्गावर परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी हे सर्वात मोठे गाव आहे. विविध जाती, धर्म, पंथांच्या आणि किल्ल्याच्या माध्यमातून ऐतिहासिक ठरलेल्या धर्मापुरी गावचे महात्म्य सर्वपरिचित आहे. गत काही वर्षांमध्ये परळी पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती ॲड. गोविंदराव फड यांच्या पत्नीकडे धर्मापुरीच्या सरपंच पदाची धुरा आली. गावात उत्तम दर्जेदार सिमेंट रस्ते, अद्यावत पाण्याची पाईपलाईन आणि प्रत्येक घरासमोर पाण्याचे नळ, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाल्यांची सफाई, स्वच्छता, विविध ठिकाणी उत्तम दर्जेदार वृक्षारोपण, उत्तम ग्रामपंचायत कार्यालय तसेच विविध विकास योजनांच्या माध्यमातून गाव समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पालकमंत्री धनंजयज मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या निधीच्या माध्यमातून धर्मापुरीत सर्वांगीण विकासाचे आणि आदर्श ग्राम रचनेचे स्वप्न अवतरल्याची भावना ग्रामस्थ अशोक फड यांनी व्यक्त केली.
धर्मापुरी आदर्श ग्राम मॉडेल बनवणार
परळी तालुक्यातील धर्मापुरी हे मोठ्या लोकसंख्येचे आणि ऐतिहासिक तसेच धार्मिक असे पवित्र ग्राम आहे. दर्जेदार सिमेंट रस्ते,नाल्या, नियमित पाणी पुरवठा, स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मोफत सुविधा आदींसह शेतकरी व ग्रामस्थांच्या वैयक्तिक समस्या व सर्वांगीण सुविधांसाठी अहोरात्र कष्ट घेत आहोत. धर्मापुरी हे आदर्श ग्राम बनत असल्याचे समाधान वाटत आहे.
- ॲड. गोविंदराव फड, सभापती, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती
===Photopath===
280221\28bed_2_28022021_14.jpg~280221\28bed_1_28022021_14.jpg