‘स्वाराती’त पुन्हा यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:24 AM2018-09-30T00:24:47+5:302018-09-30T00:25:56+5:30
येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या पथकाला यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या पथकाला यश मिळाले आहे.
गंगाखेड तालुक्यातील पुसद येथील ५० वर्षीय महिला पोटदुखीच्या आजारामुळे त्रस्त होती. मात्र, घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या महिलेस खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्य होते. ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागात उपचारासाठी आली होती. गंगाखेड येथे सोनोग्राफी केल्यानंतर सदरील महिलेस पोटात अंडाशयाचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले होते. डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेस भरती करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिये दरम्यान ३.५ किलोचा अंडाशयाचा गोळा काढण्यात आला. सदरील गोळ्याच्या देठाला चार पीळ बसले होते.
ते सरळ करून गोळा काढण्यात आला. दुसऱ्या अंडाशयाला गाठी असल्यामुळे ते अंडाशय तसेच गर्भपिशवीही काढण्यात आली. सदरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा जीव वाचला.
शस्त्रक्रियेनंतर महिला सुटीसाठी आग्रह धरत होती. डॉ. बनसोडे यांनी महिलेच्या शस्त्रक्रियेचे विरघळवण्याचे टाके दिल्यामुळे महिलेचे आरोग्य पूर्ववत झाले. त्या महिलेस सहाव्या दिवशी सुटी देण्यात आली.
या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. संजय बनसोडे यांना डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. प्रवीण राजपूत, डॉ. वर्षा वरपे, डॉ. ज्योती डावळे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. अर्चना पारसेवार, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रियांक दासीला, डॉ. पुष्पदंत रुग्गे यांचे सहकार्य लाभले. डॉ. गणेश निकम, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. निकिता यांनी भुलतज्ज्ञाचे कार्य पाहिले.
सदरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्याबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, इएनटी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे व इतरांनी स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सर्व पथकाचे स्वागत केले आहे.
६ महिन्यात ६० शस्त्रक्रिया
मागील सहा महिन्यात स्त्रीरोग विभागात गर्भाशय, अंडाशय, गर्भनलिकेच्या विविध आकाराच्या व वजनाच्या एकूण ६० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. यापूर्वी स्त्रीरोग विभागात १० किलोपर्यंतच्या गोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.