मराठवाड्यातील इंजेगावात पिकली नेदरलँडची काकडी;कृषिभूषण शेतकऱ्याने केला यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:52 PM2018-12-31T12:52:48+5:302018-12-31T12:54:39+5:30

यशकथा : शेतकऱ्याने नेदरलँड येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेतात त्याचा अवलंब केला.

Successful use of Krishakushan farmer by Kikadi of Netherlands in Marjewala | मराठवाड्यातील इंजेगावात पिकली नेदरलँडची काकडी;कृषिभूषण शेतकऱ्याने केला यशस्वी प्रयोग

मराठवाड्यातील इंजेगावात पिकली नेदरलँडची काकडी;कृषिभूषण शेतकऱ्याने केला यशस्वी प्रयोग

googlenewsNext

- संजय खाकरे ( परळी, जि. बीड) 

बीड जिल्ह्यातील इंजेगाव, ता. परळी येथील गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणारे प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण नाथराव कराड यांनी शेतात शेडनेटमध्ये नेदरलँडच्या काकडी लागवडीचा मराठवाड्यातील पहिला प्रयोग केला आहे. आतापर्यंत सात टन उत्पादन होऊन दीड लाख रुपये मिळाले आहेत. अजून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे कराड यांनी सांगितले.

नाथराव कराड हे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवित असतात. यासाठी त्यांना शासनाचा कृषिभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. नेदरलँडला भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात १६ ऑक्टोबर २०१८ रोजी नेदरलँडच्या काकडीच्या बियांची लागवड केली. २० गुंठ्यामध्ये २५ टन काकडी तयार होईल, असे नियोजन त्यांनी  केले. ही काकडी चवदार आहे. एका वेलीला साधारण ५ किलो इतकी काकडी लागली आहे. पाचपट उत्पन्न या काकडीपासून मिळते.

कराड यांनी २०१६-१७ मध्ये शेडनेट हाऊस तयार केले आहे. तसेच मत्स्यपालन, कोंबडीपालन, तुतीलागवड, रेशीम शेती, ऊस, कापसाची लागवड करून उत्पन्न वाढविले आहे. दुष्काळाशी सामना करतानाच त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. बारामती येथील भाजीपाला उच्च तंत्रज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली कराड हे नव नवीन उपक्रम आपल्या शेतात राबवितात. मागील वर्षी त्यांनी मिरची लागवड करून पाचपट उत्पादन घेतले.

थंडीमध्ये वेलवर्गीय पिकाची लागवड होत नाही हे लक्षात घेऊन नाथरावांनी सेल्फ पोलीनेट तंत्रज्ञानाचा अवलंब केला. त्यानंतर नेदरलँडच्या काकडीची लागवड केली या काकडीचे उत्पादनही पाचपट होईल असा त्यांना सुरुवातीपासूनच विश्वास होता. हा विश्वास खरा ठरला आहे. भारत सरकार शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आधुनिक युरोपीय तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीत पाचपट भाजीपाल्याचे उत्पादन होते, असा दावा कराड करतात.

शेडनेटमध्ये त्यांनी रिजवान या काकडीच्या वाणाची लागवड केली आहे. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत मिळत आहे. शेतीच्या कामात पत्नी छाया कराड यांचेही त्यांना सहकार्य असते. नेदरलँड येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या इंजेगाव येथील शेतात त्याचा अवलंब केला. त्यामुळे फळभाज्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वावलंबी बनले पाहिजे, असे नाथराव कराड म्हणतात. त्यांचे गट शेती या विषयावर राज्यभर व्याख्यान झाले आहे.

नोकरीच्या पाठीमागे न लागता कुठलाही व्यापर न करता शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन त्यांनी मानले आहे. नेदरलँड काकडीचा मराठवाड्यातील त्यांचा पहिलाच प्रयोग असून, तो यशस्वी झाला आहे. आतापर्यंत दीड लाखाचे उत्पन्न मिळाले असून, अजून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न निघणार असल्याचे कराड म्हणाले.

Web Title: Successful use of Krishakushan farmer by Kikadi of Netherlands in Marjewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.