सुदाम मुंडे प्रकरण : ‘त्या’ गर्भवतींची ना भेट, ना चौकशी; माहितीबद्दल परळी पोलीस अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 07:40 PM2020-09-17T19:40:20+5:302020-09-17T19:41:46+5:30
तीन गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चौकशी केली.
बीड : परळी येथील सुदाम मुंडे याने आपल्या दवाखान्यात तीन गर्भवतींची सोनोग्राफी केली होती. त्यातील दोघींचा विविध कारणाने गर्भ खाली झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. परंतु त्या महिलांबद्दल पोलीस अद्यापही अनभिज्ञ आहेत. त्यांची आतापर्यंत चौकशीही करण्यात आलेली नाही.
परळी येथील सुदाम मुंडे याला गर्भपात प्रकरणात शिक्षा झाली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. बाहेर येताच त्याने पुन्हा बेकायदेशीर दवाखाना सुरू केला. ही माहिती मिळताच पोलीस, महसूल व आरोग्य विभागाच्य पथकाने छापा मारत पर्दाफाश केला. त्याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
त्याने तीन गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांची चौकशी केली. यात परळी माहेर असलेल्या हैदराबाद व पुणे येथील दोन महिलांचा वेगवेगळ्या कारणाने गर्भ गायब असल्याचे समोर आले. मात्र, याबद्दल परळी पोलीस पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. उलट ही माहिती कोठून आणि कशी समजली? असा उलट सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.
‘त्या’ महिलांचे गर्भ गायब झाल्याची माहिती तुम्हाला कोणी सांगितली? आमच्याकडे तशी काही माहिती नाही. आम्ही कोणत्याच महिलेची चौकशी केली नाही. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. आमचा तपास सुरूच आहे.
- राहुल धस (उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई)