सुदाम मुंडेच्या मुलीचा घेतला जबाब; गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांनंतरही ठोस पुरावे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:17 PM2020-09-09T13:17:24+5:302020-09-09T13:20:47+5:30
परळी गर्भपात प्रकरणातील कुख्यात आरोपी डॉ. सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. यात त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले होते.
बीड : परळी येथील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणात त्याची मुलगी डॉ. प्रियदर्शिनी हिचा जबाब घेण्यात आला आहे, तसेच एका सोनोग्राफी सेंटरचालकाचाही लेखी जबाब घेऊन तो कायदा सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून याचा तपास संथ गतीने सुरू आहे.
परळी गर्भपात प्रकरणातील कुख्यात आरोपी डॉ. सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. यात त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले होते. त्यानंतर त्याने परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले. ही माहिती मिळताच प्रशासन व आरोग्य विभागाने ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या रुग्णालयावर छापा मारला. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सुदामला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. यात तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोऱ्या चिठ्ठीवर औषधांचे लिखाण
सुदाम मुंडे याच्याकडे नाव असलेला अथवा रजिस्ट्रेशन असलेला केस पेपर नव्हता. कोऱ्या चिठ्ठीवर तो औषधी लिहून द्यायचा. विशेष म्हणजे याच चिठ्ठीवर मेडिकलचालकही औषधी देत होते. गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नाहीत, तसेच अद्याप कोणाचीही चौकशी झालेली नाही. या रुग्णालयात किती लोकांनी उपचार घेतले, ते रुग्ण कुठले रहिवासी होते? याची माहितीही पोलिसांना मिळालेली नाही. कोठडीत असल्याने नियमाप्रमाणे तपास सुरू असल्याचे सांगून पोलिसांकडून याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
झोपेतून उठवताच सुदाम मुंडे पथकावर भडकला https://t.co/LZQXF4Du2I
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 7, 2020
काय म्हणतात पोलीस ?
याबाबत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. अंबाजोगाईच्या अपर अधीक्षक स्वाती भोर म्हणाल्या, ‘‘तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, माझ्याकडे माहिती नाही.’’ पोलीस निरीक्षक हेमंत कदम म्हणाले, ‘‘अद्याप कोणाचीही चौकशी झालेली नाही. कोणाला ताब्यातही घेतले नाही. पोलीस कोठडीत असल्याने नियमाप्रमाणे तपास सुरू आहे.’’
सुदाम मुंडे प्रकरणात त्याच्या मुलीसह अन्य एका सोनोग्राफी सेंटरचालकाचा जबाब घेण्यात आला आहे. तो कायदा सल्लागाराकडे पाठविला आहे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
रुग्णालयातून गर्भपातासाठी आवश्यक उपकरणे, औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला #doctor#beedhttps://t.co/ma1oioiN3c
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 7, 2020