बीडमध्ये ३६ छावण्यांची अचानक तपासणी, जनावरांची बोगस संख्या दाखवून अनुदान लाटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:50 AM2019-05-11T06:50:39+5:302019-05-11T06:51:03+5:30
चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली.
- प्रभात बुडूख
बीड - चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. कोल्हारवाडी (ता.बीड) येथील छावणीत ७४४ जनावरे कमी आढळल्याने ही छावणीच रद्द करण्यात आली. इतर ठिकाणचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व शोभा जाधव यांनी बीड तालुक्यातील १६ छावण्या, तर आष्टीतील २० छावण्या बीड उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, शोभा ठाकूर, गणेश महाडिक यांनी तपासल्या. कोल्हारवाडीत छावणी तपासताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी अडथळा निर्माण केल्याचे जाधव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आमच्या पथकाला एक तास जनावरे मोजू दिली नाहीत. नंतर अंधार पडताच वीज खंडित केली. टॉर्चच्या उजेडात केलेल्या तपासणीत ७४४ जनावरे कमी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही छावणी रद्द करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात ९३१ छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ६०० छावण्या सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १८६ छावण्या बीड तालुक्यात, तर १८५ चारा छावण्या आष्टी तालुक्यात आहेत. बीडच्या छावणीवरील जनावरांची संख्या गुरुवारी ४ लाख १७ हजार ६७१ होती. अचानक केलेल्या तपासणीमुळे दुसºयाच दिवशी शुक्रवारी छावण्यांमधील जनावरांचा आकडा १३ हजार ३४४ हजारांनी कमी झाला. कारवाईच्या भीतीनेच ही संख्या कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.