११ पंचायत समित्यांची एकाच दिवशी अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:45 AM2019-09-25T00:45:11+5:302019-09-25T00:46:29+5:30
जिल्ह्यातील ११ पंचायत समिती कार्यालयांची मंगळवारी अचानक तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील ११ पंचायत समिती कार्यालयांची मंगळवारी अचानक तपासणी करण्यात आली. या पाहणीत काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर आढळले तर काही ठिकाणी अभिलेख व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली तर काहींना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. सरप्राईज व्हिजिटमुळे दांडीबहाद्दर तसेच कामचुकार करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत यंत्रणेचा कारभार कसा चालला आहे. कार्यालयीन कामकाज, वेळेसह शिस्तीचे पालन होते का, या अनुषंगाने मंगळवारी अचानक कार्यालय तपासणी मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी पंचायत समित्यांची तपासणी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गेवराई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी बीड व शिरुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी परळी व अंबाजोगाई पंचायत समित्यांची तपासणी केली. उपमुख्य कार्याकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी धारुर व केज तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी वडवणी, माजलगाव पंचायत समित्यांची पाहणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी आष्टी व पाटोदा पंचायत समित्यांची तपासणी केली. तेथील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. या तपासणीचा अहवाल सीईओंकडे सादर करण्यात येणार आहे.
अधिकाºयांच्या या भेटींमध्ये काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेवर आले नव्हते. काही ठिकाणी पूर्वसूचना अथवा नोंद न करता कर्मचारी गैरहजर होते. त्याचबरोबर काही ठिकाणी कार्यालयीन अभिलेख व्यवस्थित तर काही ठिकाणी अव्यवस्थित दिसून आले. त्याचबरोबर इतर अनियमितता आढळून आल्या. पंचायत समित्यांशिवाय अधिकाºयांनी शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतींची अचानक तपासणी केली. या वेळी कुठे शिक्षक, ग्रामसेवक तर कुठे डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून आले.