‘वैद्यनाथ’ वजनकाट्याची विशेष भरारी पथकाकडून अचानक पाहणी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:00+5:302021-01-22T04:30:00+5:30
परळी : पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजनकाट्याची शासनाच्या वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली ...
परळी : पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजनकाट्याची शासनाच्या वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली असता, तपासणीत वैद्यनाथ कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे दिसून आले. वजनकाट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही, तसा अहवाल वैधमापन खात्याच्या पथकामार्फत देण्यात आला असल्याची माहिती वैद्यनाथचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दीक्षितुलू यांनी दिली.
यंदाचा गळीत हंगाम चालू असून, साखर आयुक्त, पुणे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या विशेष भरारी पथकाने १९ जानेवारी रोजी कारखान्यास अचानक भेट देऊन वजनकाट्याची तपासणी केली. सध्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच कारखान्यांची तपासणी केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत वैद्यनाथ साखर कारखान्याचे वजनकाटे हे अचूक आढळून आले असून, तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दीक्षितुलू यांनी दिली आहे.
नायब तहसीलदार बाबुराव रूपनर, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक पी. बी. मेने, लेखापरीक्षक श्रेणी-१ ए. बी. नागरगोजे, शेतकरी प्रतिनिधी लक्ष्मण भरत सोळुंके, माणिक रेऊ पवार, पोलीस प्रतिनिधी रामचंद्र केकान यांच्या विशेष पथकाने कारखान्यास भेट देऊन कारखान्यातील वजनकाट्यांची तपासणी केली. काट्यांच्या तपासणीवेळी कारखान्याचे चीफ केमिस्ट रमेश जायभाये, केनयार्ड सुपरवायझर वाल्मीक अघाव, केन अकौंटंट माणिक कराड यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी मजूर, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.