लॉकडाऊनमुळे लटकल्या साखरेच्या गाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:05+5:302021-04-09T04:35:05+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींना वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे पाडव्याच्या १५-२० दिवस अगोदर चौका-चौकात लहानांपासून ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींना वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे पाडव्याच्या १५-२० दिवस अगोदर चौका-चौकात लहानांपासून मोठ्या गाठ्या हातगाड्याला लावून विक्रीसाठी सज्ज असतात. परंतु, मागील वर्षी पाडव्यापूर्वी लाकडाऊन पडल्याने मोठ्या प्रमाणात बनवलेल्या निम्म्या गाठ्या तशाच तशा पडून राहिल्याने गाठी विक्रेत्यांचे खूप नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही लॉकडाऊन पडले. यामुळे केवळ एखाददुसऱ्या ठिकाणीच गाठ्या विक्रीसाठी दिसत असून या ठिकाणी केवळ छोट्या छोट्याच गाठ्या दिसत आहेत.
पाडवा आला की, होळीपूर्वीच चौका-चौकात हातगाड्यावर तसेच दुकानांमध्ये गाठ्या लटकलेल्या दिसतात. अनेक जण होळीपूर्वीच गाठ्या खरेदी करताना दिसतात. या गाठ्याचे पाडव्याच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असते. गुडीला हार म्हणून गाठी बांधतात व संध्याकाळी गुडी उतरवतात तेव्हा घरातील सर्व मंडळी गाठी प्रसाद म्हणून खातात. तर याच दिवशी घरोघरी घरात असलेल्या लहान मुलांच्या गळयात कोणाची दृष्ट लागू नये म्हणून बांधत असल्याचे जुने जाणकार सांगतात. आपल्या घरी कोणाचे मूल आले तर त्याच्या गळ्यात गाठी बांधण्याची प्रथा आहे. तर पाडव्याला भावकीत, शेजारीपाजारी असलेल्यांच्या घरी गाठ्या देतात.
मागील १५-२० दिवसात महाराष्ट्रासह माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चेमुळे गाठी तयार करणाऱ्यांनी केवळ ५० ग्रॅम ते २५० ग्रॅमपर्यंतच्या गाठी तयार केल्या. मोठ्या गाठी ऑर्डर दिल्यानंतरच तयार करून देण्यात येणार असल्याचे कृष्णा काजळे यांनी सांगितले.
यावर्षी एखाददुसऱ्या ठिकाणीच रस्त्यावर विक्रीसाठी दिसत आहेत. या गाठ्या तयार करायला खूप मेहनत लागते. त्याला लागणारे साहित्यदेखील महागले असले तरी ग्राहकांअभावी गेल्यावर्षीच्याच भावात गाठ्या विक्री होत असल्याचे सतीश जमदाडे यांनी सांगितले.
उन्हाळ्यात ऊन लागल्यावर त्रास होऊ लागल्यास या गाठीला पाण्यात भिजवून ठेवून त्याचे पाणी पिल्यास उन्हाळी कमी होत असल्याने घरोघरी वर्षभर गाठ्या सांभाळून ठेवतात.
आमचा हा वडिलोपार्जीत व्यवसाय असून दरवर्षी गाठीला चांगल्या प्रकारे ग्राहक असतात. यामुळे आम्हालाही चांगले उत्पन्न मिळते. परंतु, मागील पाडव्याला लॉकडाऊनमुळे तयार केलेला माल विकता आला नाही. तर यावर्षीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आम्ही मागणीनुसारच गाठी तयार करत आहोत.
---कृष्णा सखाराम काजळे ,गाठी उत्पादक
===Photopath===
080421\08bed_3_08042021_14.jpg