ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:31 AM2021-09-13T04:31:53+5:302021-09-13T04:31:53+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक झाली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांची नोंदणी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे करण्याचे ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक झाली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांची नोंदणी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
ऊसतोड कामगार ओळखपत्र मिळण्यासाठीच्या फॉर्ममध्ये पूर्ण नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव, बँक शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक, मागील तीन वर्षात ऊसतोड कामगार म्हणून कार्यरत असलेला तपशील यात कंत्राटदार, मुकादमाचे नाव, कारखान्याचे नाव, वर्ष व कोड नंबर देण्यात यावा. तसेच सोबत पासपोर्ट फोटोसह आधारकार्ड व बँक खाते बुकाची झेरॉक्स प्रत जोडावी, फॉर्म स्वाक्षरीसह भरून संबंधित ग्रामसेवकाकडे जमा करून जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष पांडुरंग आंधळे, बाळासाहेब मोरे, बाळू तांदळे, दादा सोनवणे, संतोष तांदळे आदींनी केले.
ऊसतोड कामगार संघटना गेल्या दहा वर्षापासून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे. या वर्षीच्या गळीत हंगामाला ऊसतोड कामगार जाण्यापूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाच्या अध्यक्षांची त्वरित निवड करावी, ऊस तोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची सुविधा लवकर उपलब्ध करावी, ऊसतोड कामगारांना कामगारांचा दर्जा द्यावा अशी मागणी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी सांगितले.