सिमेंटच्या जंगलात लुप्त होतोय सुगरणीचा खोपा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:51+5:302021-09-26T04:36:51+5:30
‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला,’ अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबद्ध करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई ...
‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला,’ अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबद्ध करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई यांच्यामुळे सुगरणीचा खोपा सर्वत्र परिचित आहे. मात्र, ग्रामीण भागांतील विहिरींमध्ये तसेच झाडांवर दिसणारे सुगरण पक्ष्याची तसेच इतरही पक्ष्यांची घरटी आता काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. घरटी विणण्यासाठी गवताच्या काड्या गोळा करून विहिरीच्या कडेवर असलेल्या पिंपळ, बाभळी, बोर, काटेरी झुडपे; जे विहिरीपेक्षा उंच व विहिरीत झुकलेल्या झाडावर घरटी बनवण्यासाठी पहिली पसंती सुगरण पक्षी दाखवतो. शेतीसाठी बागायती करण्यासाठी आज विहीर खोदण्याऐवजी शेतात घेतल्या जाणाऱ्या कूपनलिका, नदीपात्रातून केली जाणारी पाईपलाईन तर विहिरीचे पुनर्भरण, तसेच ठिकठिकाणच्या झाडांची होत असलेली तोड, यामुळे सुगरणीच्या पारंपरिक वसाहती धोक्यात आल्या आहेत. या बदलांशी जुळवून घेत या पक्ष्याने इतरत्र पण अडचणीच्या ठिकाणी वसाहती बनवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसते.
चौकट
पूर्वीच्या काळी विहिरींच्या आजूबाजूला झाडे मोठ्या प्रमाणावर बहरलेली असायची. पक्षीदेखील आपले घरटे पाणवठ्याची जागा शोधूनच शेजारी बहरलेल्या झाडांवर आपली घरटे बनवायचे. मात्र, आता पाणवठेदेखील कमी झाल्याने त्या ठिकाणांची झाडेदेखील कमी झाली. त्यामुळे पक्षी आता आपली घरटे बनविण्यासाठी काळानुरूप जागा बदलत आहेत.