माजलगावात गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:17 PM2018-12-14T17:17:12+5:302018-12-14T17:20:42+5:30
सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत.
माजलगांव (बीड ) : पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस असलेल्या गाड्या आज अडविण्यात आल्या आहेत.
तालुका परिसरात छत्रपती साखर कारखाना, जय महेश कारखाना, सुंदरराव सोळंके साखर कारखाना आहे. या तिन कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळप केल्यास ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु, गेटकेनचा उस गाळपास आणल्याने परिसरातील ऊस उभाच राहत आहे. पाण्याअभावी हा ऊस वाळत असुन कारखानदारांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होईपर्यंत गेटकेनचा ऊस गाळपास आणु नये या मागणीसाठी गेटकेनचा उस येणा-या गाड्या अडवत राष्ट्ीय महामार्गावर सोमठाणा येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे दाखल झाले असुन मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.