शेतकऱ्यांची शेतात, चोरट्यांची गावात ‘सुगी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:16+5:302021-02-15T04:29:16+5:30

कुसळंब : सद्यस्थितीतील ज्वारी काढणीच्या कामाला गती आली असून, मजूर उपलब्ध न झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात ज्वारी काढणीच्या ...

'Sugi' in farmers 'fields, in thieves' villages | शेतकऱ्यांची शेतात, चोरट्यांची गावात ‘सुगी’

शेतकऱ्यांची शेतात, चोरट्यांची गावात ‘सुगी’

googlenewsNext

कुसळंब : सद्यस्थितीतील ज्वारी काढणीच्या कामाला गती आली असून, मजूर उपलब्ध न झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात ज्वारी काढणीच्या कामात गुंतल्याची संधी साधून पाटोदा तालुक्यातील चिखलीमध्ये भर दिवसा तब्बल सहा घरे फोडून चोरट्यांनी पोबारा केला. यामुळे शेतकऱ्यांची शेतात अन‌् चोरट्यांची गावात सुगी झाल्याची चर्चा आहे.

श्री क्षेत्र गहिनीनाथ गडापासून तीन किमी अंतरावरील चिखली येथे ९ फेब्रुवारी रोजी भरदुपारी दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल सहा घरे फोडली. दादासाहेब लक्ष्‍मण येवले यांच्या घरातून साडेसहा तोळे सोने आणि ४० ग्रॅम चांदीचे दागिने कपाटातून लंपास केले; तर जनार्दन बाबू लाड यांचे चार तोळे सोने आणि ५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. नामदेव पंढरीनाथ नागरगोजे यांचे घर फोडून एक तोळा सोन्याचे दागिने, विश्वनाथ काशिनाथ शिंदे यांच्या घरातून रोख दोन हजार रुपये चोरून नेले. ज्ञानेश्वर बाबू लाड आणि शाहूराव लाड या दोन्ही घरी चोरटे पोहोचले. परंतु मुद्देमाल चोरीला गेला नसल्याचे सांगण्यात आले. भरदिवसा चिखलीमध्ये या चोरट्यांनी राबवलेल्या या मोहिमेने गावात एकच खळबळ उडाली. चर्चा सर्वत्र पसरल्यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली. चोरटे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. ही माहिती समजताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शामकुमार डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पो. कॉ. बदाम अडसूळ यांनी पंचनामा केला. तपास एपीआय श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ, केदार, सानप, आघाव अधिक तपास करत आहेत.

ज्वारी पीक काढणीची चोरट्यांनी घेतली संधी

दोन आठवड्यांपासून रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या मुलाबाळांसह ज्वारी पीक काढावे लागत आहे. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी चिखलीतील विविध बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून मुद्देमाल अलगद लांबविला.

तपास यंत्रणा सर्व बाजूंनी सज्ज

दरम्यान, चिखलीसह या भागातील इतर काही गावांची चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना आहेत. मुगाव, निवडुंगासह अन्य गावात चोरटे आल्याची चर्चा आहे. चिखलची घटना गंभीर असून, त्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले असून, लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल.

- श्यामकुमार डोंगरे, सपोनि, अंमळनेर ठाणे

Web Title: 'Sugi' in farmers 'fields, in thieves' villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.