सासूच्या जाचास कंटाळून जावयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:21 AM2019-02-19T00:21:51+5:302019-02-19T00:22:29+5:30
सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून जावायाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
केज : सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून जावायाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी केज पोलिसात सासूसह पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सारुळ येथील राजुद्दीन मैनुद्दिन सय्यद हा गावीच स्वत:च्या शेतात काम करत होता. त्यास त्याची सासू व पत्नी यांनी गावी काम करण्याऐवजी शहरात जाऊन काम करण्यासाठी तगादा लावला. तो कामासाठी केज येथे वास्तव्यास राहिला. तरीही सासू व पत्नीने राजुद्दीन यास लातूर या माहेरी कामासाठी चला असा तगादा लावत अपमानास्पद वागणूक देण्यास चालू केले. लातूर येथे न आल्यास त्याच्या मुलासह लातूर येथे घेऊन जाण्याची धमकी देत मारहाण करत त्याच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची धमकी देत असत.
दरम्यान, रविवार १७ फेब्रुवारी रोजी राजुद्दीन सय्यद यांने सारु ळ येथे स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आली. ही माहिती मिळाल्यानंतर केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्या दरम्यान राजुद्दीनच्या पँटच्या खिशात त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत राजुद्दीन याने पत्नी व सासू यांनी मला व माझ्या कुटुंबाला खुप त्रास दिल्याचे नमूद केले आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूस त्याची सासू व पत्नी हेच कारणीभूत असल्याची तक्रार मयताचे वडील मैनुद्दीन सय्यद यांनी केज पोलिसांत दिल्याने सासूसह पत्नीच्या विरोधात केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी तपास फौजदार सुरेश माळी व जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत. मयत राजुद्दीन सय्यद याच्या पश्चात दोन मुले तसेच आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.