रॅगिंगमुळे आत्महत्या : उदगीर येथून एक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:44 PM2020-02-13T13:44:12+5:302020-02-13T13:46:50+5:30
रॅगिंगमुळे विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.
बीड/उदगीर (जि. लातूर) : उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगमुळे गणेश म्हेत्रे (२०, रा. नाळवंडी, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी रॅगिंग करणाऱ्या अमोल गुमरे (रा. भोगलगाव, ता. गेवराई, जि. बीड ) या विद्यार्थ्यास उदगीर येथून बुधवारी ताब्यात घेतले .
रॅगिंगला कंटाळून विष प्राशन केलेल्या गणेशचा उपचारादरम्यान ८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी गणेशच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून अमोल व इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि. शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. ज्ञानेश्वर सानप कर्मचारी सुभाष तेलप, धनंजय कारले यांची टीम उदगीर येथील धन्वंतरी महाविद्यालयात तपासासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी चौकशी करून अमोल गुमरे याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून, याप्रकरणात सहभागी असलेल्या इतरांनादेखील लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी प्राचार्य व संबंधितांवर कडक करवाई करण्याची मागणी नाळवंडी ग्रामस्थांनी केली आहे.
महाविद्यालयाकडून बचावासाठी प्रयत्न
महाविद्यालयात रॅगिंग होत नव्हती, असा मजकूर सर्व विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने लिहून घेतला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता पाटील यांना विचारले असता, त्यांनी असा प्रकार केला नसल्याचे सांगितले.
घटना दुर्दैवी, लक्षवेधी मांडणार - विनायक मेटे
वडवणी तालुक्यात शिक्षण घेत असतान दहावीत ९६ टक्के आणि गणितात पैकीच्या पैकी गुण घेऊन राज्यात पहिला आलेला गणेश म्हेत्रे याची आत्महत्या अंतर्मुख करणारी आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रचंड त्रासामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी मांडून म्हेत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे आ.विनायक मेटे यांनी सांगितले. त्यांनी नाळवंडी येथे जाऊन म्हेत्रे कुटुंबियांचे सांत्वन केले.