उत्रेश्वर पिंपरी येथे प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:37+5:302021-07-22T04:21:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज (जि.बीड) : कोल्हापूर येथून तीन महिन्यांपूर्वी केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे वास्तव्यास आलेल्या प्रेमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज (जि.बीड) : कोल्हापूर येथून तीन महिन्यांपूर्वी केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे वास्तव्यास आलेल्या प्रेमी युगलांपैकी आधी प्रेयसीने व नंतर प्रियकराने मंगळवारी रात्री राहत्या घरात स्कार्फने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील रहिवासी आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई-वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात वास्तव्यास होता. तो कोल्हापूरमध्ये मजुरीचे काम करत असताना, घराशेजारी राहणाऱ्या सावित्रीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. सावित्रीच्या पतीचे निधन झालेले असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी हे प्रेमी युगुल कोल्हापूर येथून केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे येऊन आकाश धेंडे याच्या घरी राहत होते. मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्री आकाश धेंडे (वय २८) हिने घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आल्याने, त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेत, शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेत तिला दाखवले असता, तिने सावित्री मयत झाल्याचे आकाशला सांगितले. वयोवृद्ध महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाश धेंडे यानेही घरातील लोखंडी आडूला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता माहिती मिळताच, केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे व बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन घेत पंचनामा केला. मयतांचे शवविच्छेदन केज उपजिल्हा रुग्णालयात डॉ.घुले यांनी केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे करत आहेत. कोल्हापूर येथून गावी आलेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या का केली, याची माहिती मात्र समजू शकली नाही.