रागातून आत्महत्येची ‘पोस्ट’; शोधासाठी प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:20 AM2018-11-26T00:20:50+5:302018-11-26T00:21:09+5:30
घरगुती वाद, ताणतणाव, पैसा आदी कारणांमुळे तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट केली जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरगुती वाद, ताणतणाव, पैसा आदी कारणांमुळे तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट केली जात आहे. त्यानंतर त्याचा शोध घेताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ होते. रविवारीही असाच प्रकार घडला. माजी सरपंचाच्या मुलाने आत्महत्येची पोस्ट टाकली. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनासह नातेवाईकांचे हाल झाले. त्याचे मनपरिवर्तन करून त्याला त्यापासून परावृत्त केले. मात्र मागील काही महिन्यांपासून आत्महत्येचे पोस्ट टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे.
दुपारी ४ वाजता माफीची पोस्ट
सकाळी आत्महत्येची पोस्ट केलेल्या तरूणानेच दुपारी ४ वाजता माफीची पोस्ट टाकली. मित्र व नातेवाईकांनी आपले मनपरिवर्तन केल्याचे त्याने कबुल केले. त्यानंतर जुनी पोस्ट काढून टाकली.
सोशल मिडीयावर आत्महत्या करीत असल्याच्या पोस्टलाही अनेकांनी लाईक केले. कोणत्या पोस्टला काय करावे आणि काय नाही, याबाबतही नागरिक अनभिज्ञ असल्याचे यावरून दिसते. तर काहींनी कॉमेंट्स करून आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसल्याचे सुचविले. काहींनी अडचण असल्यास स्वत:चा मोबाईल क्रमांक देऊन अशा प्रकारापासून परावृत्त होण्यासाठी विनंती केली.