माजलगावात उन्हाचा पारा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:03+5:302021-05-04T04:15:03+5:30
माजलगाव : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी ...
माजलगाव : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. कोरोना राेखण्यासाठी लॉकडाऊन असले तरी शीतपेय, फळांची खरेदी लोक सवलतीच्या वेळेत करीत आहेत.
रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक
गेवराई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.
हातपंप दुरुस्तीची मागणी
बीड : तालुक्यातील चौसाळा, पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून ताातडीने हातपंप दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांमधून केली जात आहे.
प्रशासनाच्या सूचनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष
वडवणी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. याबाबत गांभीर्याने घेऊन रस्त्यासाठी पर्याय तयार करावा, अशी मागणी होत आहे.