उन्हाळी हंगामाने धारण केले खरिपाचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:35+5:302021-04-20T04:34:35+5:30
शिरूर कासार : तालुक्यात गत वर्षी पाऊस मुबलक झाल्याने उन्हाळी हंगामाला पाणी राहिले. परिणामी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांवर चांगलाच भर ...
शिरूर कासार : तालुक्यात गत वर्षी पाऊस मुबलक झाल्याने उन्हाळी हंगामाला पाणी राहिले. परिणामी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांवर चांगलाच भर दिला. गतवर्षी खरिपात झालेली तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी, भुईमूग,मूग,उडीद ,तीळ आदी पिके घेतली. ही पिके चांगली येतील असे चित्र सध्या दिसून येत आहे.
तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार तीन परिमंडळात सुमारे ४५१६ हेक्टरवर उन्हाळी पिकाचा पेरा आहे त्यात सर्वाधिक पेरा हा तिंतरवणी मंडळात १९५९ हेक्टर तर रायमोहा येथे १२९२ आणि शिरूर मंडळांतर्गत १२९२ हेक्टर असा पेरा आहे. सर्वाधिक बाजरीला पसंती जास्त असून २४३९ हेक्टरवर बाजरी ,त्यापाठोपाठ भुईमूग १३३४ हेक्टर, मूग ३१८ हेक्टर, उडीद २८७ हेक्टर तर तीळ १३८ हेक्टवर पेरा झाला आहे. कडक उन्हाळ्यात घामाच्या धारा वाहतांना आणि विजेचा लपंडाव सुरू असतांना देखील शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत करून पिकांची जोपासना केली. त्याचीच परिणीती म्हणून उन्हाळ्यातही शेतशिवाराने खरिपाचे स्वरूप धारण केलेले चित्र अल्हाददाई ठरत आहे. शेतकऱ्यांनी योग्य वाणांची निवड करून त्याची मेहनत करून पाहिजे त्या वेळेला पाणी देण्याचे परिश्रम घेतल्यानेच पीक जोमदार दिसत आहेत. निसर्गाने साथ दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असे तालुका कृषी मंडळ अधिकारी दिलीप तिडके यांनी सांगितले.
हिरवाईने कोरोनाचा विसर
बाजरीला कुठे दाणे चमकत आहेत तर कुठे फुलोरा बहरात आहे. मुगाला शेंगा ,तीळाला बोंड ,भगरीला तुरे असे आनंददायी हिरवीगार शेती कोरोनाचा विसर पाडत आहे. दोन वेळा आलेल्या निसर्गाचा कोप टळला आहे. आता आणखी काही दिवस अशीच मेहरबानी केल्यास कष्टाचे चीज होईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
===Photopath===
190421\19bed_3_19042021_14.jpg~190421\19bed_2_19042021_14.jpg