सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 03:44 PM2023-07-16T15:44:14+5:302023-07-16T15:45:14+5:30
सुनील शेट्टीच्या वक्तव्याविरोधात कृषिमंत्री धनंजय मुडें यांच्या परळीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलन.
परळी- भारतात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला आहे. यातच अभिनेता सुनील शेट्टी(Sunil Shetty) याने टोमॅटोच्या वाढत्या किमतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यातच आता महाराष्ट्रचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सुनील शेट्टीला 5 किलो टोमॅटो कुरिअरने पाठवून अनोखा निषेध व्यक्त केला आहे.
काय म्हणाला सुनील शेट्टी?
टोमॅटोच्या दराविषयी एका मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, 'आजकाल टोमॅटोचे दर भलतेच वाढले आहेत. याचा परिणाम माझ्या घरातही झाला आहे. म्हणूनच मी टोमॅटो खाणे कमी केले आहे. तुम्हाला वाटत असेल मी तर सुपरस्टार आहे, मला या महागाईमुळे काही फरक पडत नसेल, पण हे खोटं आहे. आमच्यावरही महागाईचा परिणाम होतो.' या वक्तव्यामुळे सुनील शेट्टीवर अनेकांनी निशाणा साधला.
धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने भाजीपाला मार्केटमध्ये रविवार(दि.१६) प्रतिकात्मक आंदोलन झाले. या वेळी राष्ट्रवादीच्या वतीने अभिनेता सुनील शेट्टीला 5 किलो टोमॅटो कुरिअरने पाठवण्यात आले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
धनंजय मुंडेंचा टोला
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर बोलताना टोमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलनं केलीत. जर एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या बाबतीत राजाकरण व्हायला नको. एक महिना टोमॅटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असे म्हणत मुंडेंनी सुनिल शेट्टीला टोला लगावला.