जिल्हा रुग्णालयात मिळणार सुपर स्पेशालिटी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:39+5:302021-01-01T04:22:39+5:30
बीड : गंभीर आजारी रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा देण्याचा विचार आहे. यानुषंगाने प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला ...
बीड : गंभीर आजारी रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा देण्याचा विचार आहे. यानुषंगाने प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. यास मंजुरी मिळाल्यास रुग्णांवर महागडे उपचार नि:शुल्क मिळतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णाय, उपजिल्हा रुग्णालय या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गंभीर आजारी रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत, यासाठी काही खासगी डॉक्टरांशी करार करून त्यांच्या मदतीने सुपर स्पेशालिटी सुविधा देण्याचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गित्ते यांचा विचार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्तांना पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना लाभ मिळणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आवश्यक ती यंत्रणा उभी करून रुग्णांना सुविधा दिल्या जातील. यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात अमाप पैसे मोजून उपचार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
तज्ज्ञ डॉक्टरांची चाचपणी
सुपर स्पेशालिटी सुविधेमध्ये प्राधान्याने किडनी, मेंदू, हृदयरोगाशी संबंधित गंभीर आजारी रुग्णांवर मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन, नेफ्रॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांची चाचचणी सुरू आहे. त्यांच्याशी करार करून त्यांची उपचारकामी मदत घेतली जाणार आहे.