मास्क व्यवस्थित न लावणारा ठरणार ‘सुपर स्प्रेडर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:27+5:302021-05-01T04:32:27+5:30
बीड : घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंडावर व्यवस्थितपणे मास्क लावावा. व्यवस्थित मास्क न लावणारे सुपर स्प्रेडर ठरून ...
बीड : घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने नाक व तोंडावर व्यवस्थितपणे मास्क लावावा. व्यवस्थित मास्क न लावणारे सुपर स्प्रेडर ठरून कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल, असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २६ एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या कालावधीत निर्बंधाच्या अनुषंगाने नागरिकांनी बाहेर पडताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर प्रशासनाने घ्यावयाची दक्षता आणि करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. या निर्देशांबाबत जनतेला अवगत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. या निर्देशांचे जनतेने कसोशीने पालन करावे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती कारवाईस पात्र राहतील, असे कळविण्यात आले आहे.
वाहनावर जाणाऱ्यांना हेल्मेट, आधारकार्ड अनिवार्य
लाॅकडाऊन निर्बंधातील सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ या कालावधीव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी वाहनाद्वारे कोणत्याही व्यक्तीस बाहेर जायचे असल्यास त्यांनी सोबत त्यांचे आधारकार्ड बाळगणे अनिवार्य राहील. आधारकार्ड नसल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल. डॉक्टर्स, वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनीदेखील त्यांच्यासोबत आधारकार्ड बाळगणे अनिवार्य राहील. रुग्णवाहिकेमधील कर्मचारी व रुग्णांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. डोळ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य राहील.
तर कोरोना टेस्ट
वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी लॉकडाऊनच्या निर्बंधाचे भंग करणाऱ्या व्यक्तींच्या आधार कार्डचा फोटो घेऊन संबंधितांविरूद्धकारवाई करू शकतील तसेच अशा व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करू शकतील.
पुढाऱ्यांना निर्बंधातून सूट नाही
लोकप्रतिनिधी, विविध राजकीय, विविध, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्यांना लॉकडाऊन निर्बंधातून सूट दिली जाऊ नये तसेच त्यांनी याबाबतीत कोणत्याही दोषी व्यक्तींना सोडण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांवर दबाव अथवा प्रभाव टाकू नये.