पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर, वाहनधारकांची उडाली भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:31+5:302021-05-05T04:54:31+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन दी स्पॉट’ कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, ...
बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन दी स्पॉट’ कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, तसेच पोलिसांनीदेखील कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होेते. त्यानुसार बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस अधीक्षक आर. राजा आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. या कारवाईमुळे वाहनधारकांची भंबेरी उडाली. यावेळी काही नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली, तर विनाहेल्मेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सोमवारी आर. राजा व त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत नगरनाका परिसरातून येणारी वाहने अडविली. त्यांचे प्रवासाचे कारण विचारले व हेल्मेट न घातल्यामुळे दंड आकारण्याचे आदेश दिले. यावेळी वाहतूक पोलीस, तसेच इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. लांबच लांब रांगा यावेळी रस्त्यावर पाहावयास मिळाल्या. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले, तर कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसाय, रोजगार बंद आहेत. आर्थिक व इतर अडचणींमुळे हेल्मेट सक्ती करणे ही बाब योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर ४ वाजेपासून कारवाया थंड झाल्या होत्या. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले.
पोलिसांनाही ठोठावला दंड
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावरून परतत होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना रोखून हेल्मेट नसल्याचे कारण सांगून दंड भरण्याचे आदेश दिले.
चावी काढताना महिला पडली
दुचाकी अडविण्यासाठी पोलीस कर्मचारी दुचाकीच्या चाव्या काढत होते. यावेळी घाईगडबडीत एका दुचाकीची चावी काढताना दुचाकीस्वार महिला खाली पडली. तिच्या हाताला मार लागला होता. तिला समजावण्याऐवजी उपाधीक्षक संतोष वाळके ‘गाडी बोलवा, आत टाका’ अशी भाषा वापरत होते. दंड भरण्यास तयार असूनदेखील अशी भाषा वापरल्यामुळे त्या महिलेने नाराजी व्यक्त केली.
मोबाईल अँटिजनमध्ये ४३ पॉझिटिव्ह
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बीड शहरातील ८ ठिकाणी व अंबाजोगाई शहरातील ६ ठिकाणी ७१० जणांची मोबाइल अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये ४३ जण कोरोनाबाधित निघाले असून, ६६७ जण निगेटिव्ह आले आहेत.