पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 03:28 PM2021-03-24T15:28:06+5:302021-03-24T15:30:18+5:30

नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांत होती.

Superintendent of Police's team crackdown on sand mafias; 1 crore 35 lakh confiscated | पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देपुरुषोत्तमपुरीत ३ टिप्पर, एक जेसीबीसह १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्तवाळूची चोरी महसूल-पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.

माजलगाव (जि. बीड) : मंगळवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पुरुषोत्तमपुरी येथील नदीपात्रात धाड टाकून अवैधरीत्या वाळू भरणारे ३ टिप्पर व १ जेसीबीसह १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या हायवापैकी एक हायवा पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची चर्चा आहे.

तालुक्यात २४ गावे वाळूसाठा उपलब्ध असलेली आहेत. मात्र, लिलावापेक्षा वाळूच्या चोरट्या तस्करीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्त पैसा मिळत आहे. तालुक्यातील ३ वाळूघाटांचा लिलाव होऊनही ते सुरूच नसल्याने माफियांकडून गंगामसला, बोरगाव, पुरुषोत्तमपुरी, आबेगाव, रिधोरी, गव्हाणथडी यासह अनेक ठिकाणांहून वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. मात्र, स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्याकडून कुठलीही कारवाई न करता अभय देण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी हॅलो बीड आवृत्तीमध्ये ‘वाळूच्या चोरट्या धंद्याने डोके काढले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास हजारे यांच्या टीमने मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुरुषोत्तमपुरीत थेट गोदापात्रात कारवाई केली. तेथे वाळू उपसा करीत असलेले जेसीबी, वाळूसह तीन टिप्पर, असा १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टिप्परवर नंबरदेखील खोडलेले आहेत. याप्रकरणी आरोपी शेख बशीर शेख चांद व इतर तीन यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे आली कारवाईची वेळ
तालुक्यात वाळूची चोरी महसूल-पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या पथकाला कारवाई करण्याची वेळ आली. मंगळवारी नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांत होती. मागील महिन्यात खुद्द उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीकांत गायकवाड यांनाच वाळूसाठी ६५ हजारांची लाच घेताना पकडले होते.

Web Title: Superintendent of Police's team crackdown on sand mafias; 1 crore 35 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.