उड्डाण पुलाच्या कामावर हायवा ट्रक अंगावरून गेल्याने सुपरवायझरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 05:35 PM2018-12-27T17:35:47+5:302018-12-27T17:38:34+5:30
हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आज दुपारी रास्तारोको आंदोलन केले.
गेवराई (बीड ) : राष्ट्रीय महामार्गावर गढी येथे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. यावेळी मुरूम टाकताना हायवा ट्रक अंगावरून गेल्याने कामाची देखरेख करणाऱ्या सुपरवायझरचा मृत्यू जागीच मृत्यू. शेख इसुफ शेख इब्राहिम (४२, रा.नांदुरहवेली, बीड) असे मृताचे नाव असून ही घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. दरम्यान, हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आज दुपारी २ वाजता पाडळसिंगी येथे रास्तारोको आंदोलन केले.
शेख इसुफ शेख इब्राहिम हे आय.आर.बी या कंपनीत रस्त्याच्या कामावर सुपरवायझर म्हणुन काम करत होते. कंपनीद्वारे सध्या गढी येथील उड्डाण पुलावर मुरूम भरण्याचे काम सुरु आहे. बुधवारी एक हायवा ट्रक ( जी.जे.26 टि.6562 ) मुरूम घेवुन पुलावर आला. यावेळी तेथे उभा असलेल्या शेख इसुफ शेख इब्राहिम यांच्या अंगावरून हायवा ट्रक गेल्याने ते जागीच ठार झाले.
दरम्यान, हा अपघात नसुन तो अंगावर गाडी घालुन खुन असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. हायवा चालकावर व कंपनी विरूद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नातेवाईकांनी पाडळसिंगी येथील नवीन टोल नाक्यावर दुपारी 2 वाजता एक तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांनी नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणी योग्य तपास करून कारवाई करू असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.