शेतीपूरक व्यवसायाची धरली साथ; शेळीपालनातून शेतकऱ्याने मिळवले साडेबारा लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:41 PM2020-07-16T19:41:58+5:302020-07-16T19:42:30+5:30
दिंद्रूडच्या शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसायातून प्रेरणा
- संतोष स्वामी
दिंद्रूड : परंपरागत शेतीला फाटा देत अवघ्या एक एकर शेतीत शेळीपालनाचा प्रकल्प उभारत माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड लगतच्या पिंपळगाव येथील शेतकऱ्याने दोन वर्षांत तब्बल साडेबारा लाखांची मिळकत मिळवली आहे. शेतीपूरक व्यवसायिकांसमोर प्रेरक पाऊल ठेवले आहे.
सुभाष मायकर या शेतकऱ्याकडे पिंपळगाव शिवारात २० एकर शेती आहे. दिंद्रुड-बेलोरा रस्त्यावर असलेल्या एक एकर शेतीत केवळ २० गुठ्यांत शेळीपालनाचा शेड उभारला आहे तर उर्वरित २२ गुंठ्यात मारवेल गवत व मेथी घास शेळींना चारा पेरा केला आहे. मायकर यांनी दोन वर्षांपूर्वी ३५ शेळ्या व आफ्रिकन बोर जातीचे एक बोकड व एक राजस्थानी कोठा जातीचे एक असे दोन बोकड विकत घेतले. या सुरु केलेल्या प्रकल्पात सद्यस्थितीत त्यांच्या प्रकल्पावर २१० शेळी व बोकड त्यांनी कमावली आहेत. बंदिस्त शेडमध्ये शेळीपालन होत असल्याने शेळ्यांना कुठलाही प्रकारचा आजार होत नसल्याचे मायकर यांनी सांगितले. शेळी पालनासाठी माझा परिवार त्यांच्या प्रकल्पात काम करत आहे. मायकर यांच्या शेळीपालन प्रकल्पास शेळीपालन उत्सुकतेने भेटी देतात.
अशी केली जाते निगराणी
शेळ्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आले असून बंदिस्त शेडमध्ये ९ विविध टप्प्यानुसार शेळ्यांचे विभाग पाडले आहेत. यात शेळ्यांना सकाळी ७ वाजता २०० ग्रॅम मकाचा खुराक, सकाळी ९ वाजता सोयाबीनचा भुसा, १२ वाजता मेथी घास, दुपारी ३ वाजता मारवेल गवत दिले जाते. सायंकाळी ५ वाजता पिलांना शेळीचे दूध व वयातील शेळी-बोकडांना ज्वारीचा कडबा असा नित्यक्र म चालतो. वर्षात दोनदा इिटवी व पीपीआरची लस या शेळ्यांना देत आरोग्याची काळजी घेतली जाते.
या व्यवसायात भरघोस नफा आहे
शेतीतील उत्पादन केलेल्या कडधान्याच्या टाकाऊ वस्तुपासून शेळ्यांना खाद्य म्हणून वापर करता येतो. पर्यायाने कमी खर्चात शेळी पालन होत असून भरघोस नफा या व्यवसायात आहे. शेतीत पुरेसे पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी या व्यवसायात उतरत नशीब आजमावल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
- सुभाष मायकर, शेतकरी