आगामी पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ द्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:04 AM2019-09-08T00:04:06+5:302019-09-08T00:04:32+5:30
गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड : तुमचं आमचं विकासाचं नातं रक्तापेक्षा मजबूत आहे. समोरच्या माणसाची उंची किती आहे, त्यांनी कोणती कामे केली हे तपासले पाहिजे. सर्वांना सोबत घेवून भेडसावणारे प्रश्न कोण सोडवितो हे पाहिले पाहिजे. गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. आता चिन्ह बदलले असून प्रत्येक घरोघरी जावून धनुष्यबाणाचे चिन्ह समजावून सांगावे. मी आता शिवधनुष्य हाती घेतले आहे, सर्वांनी सहकार्य करून ताकत द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंझेरी फाटा ते कर्झणी रस्त्याचे उद्घाटन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, राणा डोईफोडे, गोरख शिंगण, रतन गुजर हे उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले की, या भागात नॅशनल हायवे २११ ते कर्झणी या रस्त्याचे उद्घाटन झाले असून त्याचे काम लवकरच सुरू होऊन वाहतूक सुरळीत होईल. रस्त्याच्या जोडणीबरोबरच मतांची जोडणी करावयाची आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडले असून कर्झणीच्या तलावात तीस ते चाळीस टक्के पाणी आहे. येथे अनेक विकासाची कामे झाली असून या पुढेही गावाला कोठेही कमी पडू दिले जाणार नाही. आतापर्यत सुविधा आणि गरजा पूर्ण करण्याचे काम केले. रेशनकार्ड, गॅस कनेक्शन आदी योजना राबवून श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन आता सहाशे ऐवजी एक हजार रुपए एवढे वाढविले असून जे घटक परिघाबाहेर आहेत त्यांचा कसा फायदा होईल यासाठी सरकारच्या माध्यमातून काम करीत आहोत. कोणी कोठेही असले तरी ते मनाने आपल्याबरोबर आहेत. मंत्रीपदाचा आणि संधीचा वापर विकासासाठी केला. मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून समुद्राला वाहून जाणारे ६०० टि.एम.सी पाणी मराठवाड्यात वळविल्यानंतर येथील जनता कधीही विसणार नाही. ३० हजार कोटींच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे ते म्हणाले.
कुंडलिक खांडे म्हणाले, क्षीरसागर यांची ताकत जिह्यातच नव्हे तर राज्यातही आहे. कर्झणीकरांनी एकमुखी मतदान केले पाहिजे. त्यांना राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून ताकत उभी करावी. ही निवडणूक स्वत:ची समजून जोमाने कामाला लागावे असे ते म्हणाले.
सचिन मुळूक, राणा डोईफोडे, गोरख शिंगण यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, अरूण बोंगाणे, सर्जेराव शिंदे, शुभम कातांगळे, सर्जेराव खटाणे, शिवानंद कदम, सदाशिव सुर्वे, देवीदास डांगे, मंदाबाई खटाणे, शहादेव डांगे, विठ्ठल साबळे, राजाभाऊ खुरणे, पठाण अहमद, अन्साराम मोरे, सुनील साबळे, दिलीप डोळे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची उपस्थिती होती.