कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 07:55 PM2024-11-26T19:55:54+5:302024-11-26T19:57:15+5:30

पाऊण लाखांवर मताधिक्य घेत धोंडे, आजबे, शेख यांना रोखले

Suresh Dhas became the king of Ashti by holding the hands of the workers and campaigning carefully | कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

- अविनाश कदम
आष्टी :
विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेबूब शेख यांच्यात चौरंगी लढत होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, सुरेश धस यांना जनतेने मोठे मताधिक्य दिल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून आले. सुरेश धस यांनी १ लाख ४० हजार ५०७ मते घेत भीमराव धोंडे, महेबूब शेख, बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला.

येथील आयटीआयमध्ये २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम झालेल्या पोस्टल मतमोजणीत २४३ मतांनी धस पुढे होते. त्यानंतर यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १,८७९ मतांपासून शेवटच्या ३२व्या फेरीपर्यंत ७७ हजार ९७५ मतांची आघाडी घेऊन धस यांनी दणदणीत विजय मिळविला. सुरेश धस यांनी मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. एक वेळा विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली.

सुरेश धस यांच्या विजयाची कारणे
१) धोंडे, आजबे, शेख तिघे विरोधात असल्याने जनतेची मिळालेली सहानुभूती.
२) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच सरकारच्या विविध योजनांमुळे जनतेचा कौल.
३) निवडणूक प्रचाराचे नियोजन आणि गावागावातील कार्यकर्त्यांनी जोमाने केलेले काम.
४) धस कुटुंबातील देविदास धस, प्राजक्ता धस, जयदत्त धस, श्याम धस, सागर धस हे मतदारसंघात प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

भीमराव धोंडे यांच्या पराभवाची कारणे
१) सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सामील न होणे.
२) व्यक्तीगत जनतेची कामे करण्यात कमी पडले. जुन्या - नव्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यात अपयश.
३) जातीयवादाचा फटका बसला, कार्यकर्ते व नियोजन असणाऱ्यांचा कारभार नडला.
४) ओबीसी मतांची विभागणी झाल्याने एकगठ्ठा मतदान झाले नाही.

मतमोजणीच्या ठिकाणी घडामोडी
सकाळी आठ वाजेपासून १४ टेबलवर ३२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. संरक्षणासाठी अपर पोलिस अधीक्षकांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मतमोजणी प्रक्रियेसाठी ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी वसीमा शेख यांनी विजयी उमेदवार सुरेश धस यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

Web Title: Suresh Dhas became the king of Ashti by holding the hands of the workers and campaigning carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.