जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेल्या उपचारासह पुन्हा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:19+5:302021-07-11T04:23:19+5:30
बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना आता सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या दोन व इतर १३५ ...
बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रियांना आता सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या दोन व इतर १३५ गंभीर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच छोट्या शस्त्रक्रियांचा आकडाही २०५ आहे. नियोजनबद्ध काम केले जात असल्याने सरकारी यंत्रणेवरील विश्वास वाढून रुग्णसंख्याही वाढत असल्याचे दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस सुधारत असल्याचे दिसत आहे. सीझर, अपेंडिक्स, हर्निया अशा प्रकारच्या जवळपास १३७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच प्रसूती, गर्भपात अशा प्रकारच्या २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला बीड जिल्हा रुग्णालयात आणि आता उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन रमा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा सामान्यांसाठी सक्षमपणे काम करीत असल्याचे दिसत आहे.
बीडसह नेकनूर, धारूर, माजलगाव, आष्टीत सुरू
जिल्हा रुग्णालयात सर्वांत अगोदर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. जवळपास दीड वर्षापासून शस्त्रक्रिया बंद होत्या. बीडपाठोपाठ नेकनूर, आष्टी, धारूर आणि माजलगावातही शस्त्रक्रिया करण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. अगोदर केवळ प्रसूती व इतर अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. आता हळूहळू सर्वच सुरू होत आहेत.
ओपीडीत येणाऱ्यांची संख्याही वाढली
n कोरोनाकाळात ओपीडीची संख्या रोज साधारण ५० होती. आता ती वाढून ३०० ते ४०० होत असल्याचे सांगण्यात आले.
n कोरोनामुळे विस्कळीत झालेली यंत्रणा आता कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
n ओपीडीत न बसणारे डॉक्टरही आता वेळेवर बसून रुग्णसेवा करीत असल्याने समाधान व्यक्त होते आहे.
तालुका, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुचना देतो
मागील दीड वर्षापासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यामध्ये आरोग्य यंत्रणा व्यस्त होती; परंतु आता कोरोना नियंत्रणात येत आहे. इतर आजारांचे रुग्णही शोधले जात आहेत. शस्त्रक्रियांची गरज असणाऱ्यांना, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात पाठविण्याबाबत सर्वांना आदेश देतो.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी
सामान्यांचा विश्वास जिंकण्यात यश
सरकारी यंत्रणेवर सामान्यांचा विश्वास बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा दिल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याचे पाहून समाधान वाटते. सर्वांचा विश्वास सार्थकी ठरवत आहे. कोरोनाची काळजी घेण्यासह थोडाही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड