सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:09 PM2023-03-29T14:09:11+5:302023-03-29T14:12:11+5:30
सुषमा अंधारेंवरील टीकेसंदर्भात भाजप नेते निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली.
बीड - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर, शिवसेनेच्यावतीने सुषमा अंधारेंच्या नेतृत्त्वात महप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेतून अंधारेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेत बंड केलेल्या सर्वांनाच धारेवर धरले. अगदी, कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणेंसह, राणे बंधुंवरही टीका केली. त्यामुळे, अंधारे यांच्यावरही शिवसेना नेते तसेच राणेंकडून पलटवार करण्यात येत आहे. नुकतेच संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे सुषमा अंधारे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
सुषमा अंधारेंवरील टीकेसंदर्भात भाजप नेते निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली. सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात, जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. त्या कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं. केज न्यायालयात 2020 मधील प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणे आज हजर झाले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अंधारे ताईंनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजे, तुमचा अधिकार काय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर बोलता, मग कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवालही राणेंनी केला. दरम्यान, निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत रिकामटेकडे आहेत, त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय? पत्रा चाळ प्रकरणातील ते आरोपी आहेत, असेही राणेंनी म्हटले.
शिरसाट-अंधारे वाद चर्चेत
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या विधानावरुन महिला आघाडीमध्ये असंतोष पसरला आहे. ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध दुपारच्या सुमारास जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातील ठाकरे गटाच्या महिलांकडून आमदार शिरसाट यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनीही महिला आयोगाकडे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलीय.