पाणीपुरवठा योजनेच्या संचिकेवरील स्वाक्षरीने संशयकल्लोळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:59 PM2019-11-18T23:59:08+5:302019-11-19T00:01:06+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील पाणी पुरवठा योजनेच्या निविदेवरील सीईओंच्या स्वाक्षरीवरुन संशय निर्माण झाला असून या स्वाक्षरीबाबत सोमवारी खातरजमा करण्यात येत होती.
बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत महासांगवी (पाटोदा) येथील पाणी पुरवठा योजनेबाबत एक निविदा प्रसिद्ध झाली आहे. सदर निविदा या पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाल्याचे दिसत आहे. येडगे यांची आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात बीडहून बदली झालेली आहे. निविदा आदेश आणि संचिकेवरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत तफावत असल्याची माहिती समोर येत आहे.
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला भेट दिली होती. यावेळी सदर प्रकरणाबाबत विचारणा केल्याचे समजते. सदर स्वाक्षरी बनावट आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरु होती.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वाक्षरीबाबत तत्कालीन सीईओंशी संपर्क करुन पडताळणी करण्यात येत असून याला थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.