धुमेगावच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:11 AM2020-01-07T01:11:07+5:302020-01-07T01:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील एका तरुणाने १० दिवसापुर्वी विष प्राशन केले होते. त्याचा सोमवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील एका तरुणाने १० दिवसापुर्वी विष प्राशन केले होते. त्याचा सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मात्र, त्याने विष प्राशन केले नसून त्याला विष पाजल्याचा संशय मुलाच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईंकांनी घेतला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
जिजाबा गंगाराम कुलाळ (वय २५ वर्ष रा. धुमेगाव ता. गेवराई ) या तरुणाने २५ डिसेंबर २०१९ रोजी शेतात विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्याला गावातील काही मंडळींनी व चकलंबा पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. कारण, मुलाचे आणि गावातील एका मुलीचे प्रेमप्रकरण होते. या कारणावरून तिच्या घरच्या मंडळींनी त्याला विष पाजल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे यांची नातेवाईकांनी भेट घेतली. त्यानंतर चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रमुख सुपोनि देशमुख यांनी देखील पोलीस अधीक्षक कार्यालात धाव घेतली. दरम्यान पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी याप्रकरणी फिर्याद घेण्याचे आदेश देशमुख यांना दिले. त्याप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून, या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, तरुणाने स्वत: विष प्राशन केल्याची चकलांबा पोलिसांची माहिती आहे. तसेच गावातील बघ्याचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सखोल तपास करतील त्यानंतर सर्व प्रकार निष्पन्न होणार आहे, असे वरिष्ठांनी सांगितले.
‘ठाणे प्रमुखांनी योग्य वागणूक दिली नाही’
चकलंबा येथील सपोनि देशमुख यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नाही. यापुर्वी काही महिन्यापुर्वी उसतोडणीला जाण्यापुर्वी अशाच प्रकारे भांडणे झाली होती. त्यावेळी चकलंबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. परंतु, ठाणेप्रमुख देशमुख यांनी आपल्याला योग्य वागणूक न दिल्याचा आरोप यावेळी मयताचे वडील गंगाराम यांनी केला.