धक्कादायक ! करणीतून म्हैस मारल्याचा संशय; बदला म्हणून दाम्पत्याने केली ६ वर्षीय बालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:48 PM2021-02-06T18:48:34+5:302021-02-06T18:56:07+5:30
गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केल्याचे उघडकीस आले.
बीड : करणी केल्याने म्हशीचा मृत्यू झाला, अशा संशयातून बदला घेण्यासाठी ६ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील रत्नागिरी येथे घडली होती. अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केला. दरम्यान, ‘आमच्या म्हशीवर करणी केल्याने तिचा मृत्यू झाला, त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाचा खून केला,’ अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली. दोन कुटुंबांत झालेल्या वादातून लहान मुलाचा खून झाल्याने सर्वत्र रोष होता. पोलिसांवरही आरोपी शोधण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र, नेकनूर ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह आढळलेल्या जागेचे अवलोकन करून, परिसरातील घरांचा व तेथील माणसांची सर्व पार्श्वभूमीची माहिती घेतली व आरोपी रोहिदास व देवईबाई या दोघांना अटक केली. दरम्यान, आरोपीने खून केल्याची कबुली दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. गुरुवारी गुन्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांना शुक्रवारी बीड येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.
ग्रामस्थांना बसला धक्का
रत्नागिरी येथील बालकाचा खून संशयातून केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर ग्रामस्थांना धक्का बसला. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून लहान मुलाचा खून करणे हे वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली, तसेच कठोर शिक्षा करण्याची मागणीही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.