लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:00 AM2019-12-30T00:00:07+5:302019-12-30T00:00:46+5:30
शहरातील एका लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील प्रकरणात जामिनावर बाहेर असताना मारहाण करून व धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
बीड : शहरातील एका लॉटरी चालकाला धमकी देऊन पैसे मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्ह्यातील प्रकरणात जामिनावर बाहेर असताना मारहाण करून व धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई करत दरोडाप्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
करण प्रताप गायकवाड (रा.बारादरी यादवाचा मळा गल्ली बीड) असे त्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दोन खून, जबरी चोरी, मारामारी असे १० गुन्हे दाखल आहेत. तो मागील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहे. शनिवारी ५.३० वाजता करण हा शहरातील भाजीमंडई परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात गेला होता. तो लॉटरी चालकाच्या ओळखीचा होता. त्याठिकाणी तो लॉटली खेळला त्याच्याकडे लॉटरी खेळण्यासाठी देखील पैसे नव्हते.
दुकानदाराला धमकी देत त्याने तो लॉटरी खेळला. त्यानंतर त्याने ‘मी पैसे जिंकलो असून, मला ४५०० रुपये दे’ असे म्हणत लॉटरी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी करण गायकवाड याने दुकानातील डेस्कटॉप उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकला. तसेच त्याला मारण्याचा धाक दाखवला, दरम्यान करण याने लॉटरी चालकाच्या गल्ल्यातील ४५०० रुपये घेऊन करण त्याठिकाणावरून निघून गेला. यादरम्यान लॉटरी चालकाचा मोबाईल भिंतीवर फेकून दिला यामुळे मोबाईलचे नुकसान झाले.
त्यानंतर लॉटरी चालकाकाने करण प्रताप गायकवाड याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान करण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून १० गुन्हे दाखल असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोनि वासूदेव मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यासाठी तीन टिम तयार करण्यात आल्या होत्या. तिन्ही टीमने तपासाची चक्रे फिरवत सराईत गुन्हेगार करण गायकवाड याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणे प्रमुख मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कांगुने हे करत आहेत.