बीड जिल्ह्यात ८२ स्वस्त धान्य दुकाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:50 PM2018-06-18T23:50:30+5:302018-06-18T23:50:30+5:30
बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधील काळाबाजार रोखण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे ३० टक्क्यांपेक्षा अधिक धान्य वितरीत करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी ए. टी. झिरवाळ यांनी दिले होते. तसेच आॅनलाईन वितरण कमी असणाऱ्या ५२१ धान्य दुकानदारांना नोटीस देखील बजावली होती. मात्र त्यानंतर देखील काही दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आॅनलाईन वितरण केले नाही.
शासनाच्या आदेशानंतर देखील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन धान्य वितरण १५ टक्क्यांपेक्षा कमी केल्यामुळे जिल्ह्यातील ८२ दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानांवरील निलंबन रोखण्यासाठी राजकीय क्षेत्रातून दबाव आणला जात आहे.
निलंबन रोखता येईल
एप्रिल आणि मे महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे १५ टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरीत केलेल्या दुकांनावर ही कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांनी जर जून महिन्यात आॅनलाईन धान्य वितरण केले तर निलंबनाची कारवाई रोखता येईल.