शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा 'सस्पेन्स'; दिग्गजांचे मुंबईत ठाण, इच्छुकांची वाढली धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:22 PM2021-11-27T13:22:00+5:302021-11-27T13:23:35+5:30
Beed Shic Sena : माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या.
बीड : कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना (Shiv Sena ) जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळताच आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली. असे असले तरी शुक्रवारी रात्रीपर्यंत निवड न झाल्याने सस्पेन्स ( Suspense over Shiv Sena Beed district chief's) कामय आहे. तर इच्छुकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तसेच पदाला स्थगिती मिळालेले खांडेदेखील गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात दाखल झाले. तर दुसऱ्या बाजुला माजी मंत्री बदामराव पंडित व बांधकाम सभापती युद्धजित पंडित हे दोघे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. या घडामोडींमुळे पक्षश्रेष्ठींपुढेही नवा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळाली होती. केज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची तक्रार झाल्यानेच त्यांच्या पदाला स्थगिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु स्थगिती मिळताच आता हे पद आपल्याला मिळावे, यासाठी माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांचा सत्कार करून एकाच बाकावर सर्व इच्छुक बसल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. परंतु अद्यापही निवडीबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये विचार विनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीडमधून गेलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनात धाकधूक कायम असल्याचे दिसते. आता हे पद कोणाला मिळणार, याकडे मात्र जिल्हावासीयांसह राजकीय कार्यकर्ते, नेत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.
पक्षश्रेष्ठींपुढे एकमेकांवर टिकेचे 'बाण'
बीडमधून जेवढे इच्छुक गेले त्या सर्वांनी शिवसेना सचिव अनिल देसाई, संपर्क प्रमुख आनंद जाधव, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूळकर यांच्या भेटी घेतल्या. यावेळी पक्षसंघटन वाढविण्याबाबत कोणीच जास्त बोलले नाहीत. केवळ एकमेकांविरोधात आरोप केले. आगामी निवडणुकांबाबतही कोणीच काही बोलले नाही. केवळ पद आपल्याला कसे मिळेल, यातच सर्वांची चढाओढ असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षश्रेष्ठींनीही इच्छुकांच्या कामाचा 'लेखाजोखा' मागितल्याचे सूत्रांकडून समजते.
---खांडेंनी लावली पूर्ण ताकद
पदाला स्थगिती मिळालेले कुंडलिक खांडे यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पत्रकार परिषद घेऊन आपल्याला यात गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी प्रस्थापितांवरही आरोप केले होते. दरम्यान, परिषद पार पडताच खांडे यांनी मुंबई गाठली. शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात जावून पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. आपले पद कायम ठेवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.