शंभू महादेव कारखान्याच्या लिलावाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:44 AM2018-10-27T00:44:25+5:302018-10-27T00:45:59+5:30
उस्मानाबादच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडा घातला होता. तसेच ११ बँकांकडून कर्जही घेतले होते. हे कर्जवसुलीसाठी बँकांनी शंभू महादेव कारखान्याचा लिलाव करून कर्ज वसुल करण्याची तयारी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : उस्मानाबादच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडा घातला होता. तसेच ११ बँकांकडून कर्जही घेतले होते. हे कर्जवसुलीसाठी बँकांनी शंभू महादेव कारखान्याचा लिलाव करून कर्ज वसुल करण्याची तयारी केली होती. मात्र ठेविदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने लिलावाला स्थगिती दिल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कर्ज परत मिळण्याच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
शुभकल्याण मल्टीस्टेट बँकेचा अध्यक्ष दिलीप आपेट हा आहे. सध्या तो बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. आपेटने आपल्या मालकीच्या शंभू महादेव साखर कारखान्यासाठी वैद्यनाथसह इतर ११ बँकांकडून ४५ कोटींचे कर्ज घेतले होते. हे सर्व कर्ज त्याने थकवले होते. बँकांनी या प्रकरणात शंभू महादेवचा लिलाव करुन कर्ज रक्कम वसूलीची तयारी केली होती. मात्र ठेवीदारांनी या लिलावातून शुभकल्याणच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच या लिलावाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्याने शुभ कल्याण मल्टीस्टेट बँकेच्या जिल्ह्यासह राज्यभरात जवळपास १०० शाखा आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास १० ते १२ शाखा होत्या. मुदत ठेवींवर ज्यादा व्याजदर देण्याची योजना सुरु करुन शुभ कल्याणने कमी काळात कोट्यवधींच्या ठेवी ग्राहकांकडून जमा केल्या.
त्यानंतर काही दिवसांनी जमा केलेली ठेव परत मिळत नसल्याने चौकशी सुरू केली. यावेळी बँकेने उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर ठेविदारांनी पोलीस ठाणे गाठून अध्यक्षासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. जिल्ह्यात संचालक मंडळाविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १० गुन्हे नोंद आहेत.
तपासाला गती : मालमत्ता विक्रीचे प्रस्ताव
४जिल्ह्यात विविध बँक, मल्टीस्टेटमध्ये झालेल्या अपहार, कर्ज प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. सुरूवातीला या शाखेच्या तपासाची गती मंद होती. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी कारभार स्विकारताच तपासाची चक्रे गतीने फिरविली. आपेटला बेड्या ठोकण्यासह अनेक संचालक, मॅनेजर, कर्मचाºयांना ताब्यात घेत चौकशी केली. गुन्हे शाखेने संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे प्रयत्न केले आहेत. ग्राहक हित संरक्षण कायद्यानुसार कारवाई करुन संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करुन ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने प्रस्ताव दाखल केला आहे.
लिलावाची १५ कोटी रक्कम जमा
आपेटच्या मालकीचा शंभू महादेव कारखान्याचा लिलाव ५४ कोटी रूपयांत करण्यात आला होता. यासाठी केवळ एकाच व्यक्तीने बोली लावल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे यातील १५ कोटी रूपयांची रक्कमही बोली लावणाºयाने जमा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.