वादग्रस्त पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित; आ. मुंदडांच्या लक्षवेधीनंतर फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:34 AM2022-08-18T11:34:45+5:302022-08-18T11:38:04+5:30
गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे भोवले; आ. नमिता मुंदडा यांनी मांडली होती विधानसभेत लक्षवेधी
अंबाजोगाई/बीड: अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेले अवैध धंदे, गुंडगिरीकडे दुर्लक्ष करणे आणि बनावट दारूच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांना चांगलीच भोवली आहे. आ. नमिता मुंदडा यांनी ग्रामीण ठाण्यातील बेबंद कारभाराबद्दल लक्षवेधी दाखल केल्यानंतर मोरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत घोषणा केली.
ग्रामीण ठाण्याच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांच्या सहेतुक दुर्लक्षामुळे सर्वत्र अवैध धंदे फोफावले आहेत. गुटखा, हातभट्टी, बनावट दारूची सर्रास विक्री वाढली. बेकायदेशीर क्लब, जुगारअड्डे राजरोसपणे सुरु असून गुंडांचा हैदोस वाढला आहे. ठाण्यात अवैध धंदेचालक, गुंड यांचा राबता असून त्यांना मोरे यांच्याकडून सन्मान तर सामान्य नागरिकांना मात्र दुय्यम दर्जाची वागणूक मिळू लागली. त्यांच्या काळात गैरप्रकारांवर एकही लक्षणीय कारवाई झाली नाही. याउलट अनेक वादग्रस्त प्रकार त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घडले आहेत. दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाचखोरीचे गुन्हे नोंदवले. तसेच, जप्त केलेला गुटख्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन झाले. पोलीस ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेले गैरप्रकार ठाणेप्रमुख मोरे यांना माहिती नसावेत असे शक्य नाही, उलट त्यांच्या आशीर्वादामुळेच कर्मचारी गैरप्रकार करण्यास धजावत असावेत अशी कुजबुज सुरु झाली होती.
बनावट दारूच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई
मोरे यांनी ०८ जुलै रोजी वरपगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले. मात्र, दुसऱ्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याच ठिकाणी छापा मारून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आदल्या दिवशीच पोलिसांनी छापा मारलेला असताना एक्साईजला पुन्हा मुद्देमाल कसा काय सापडला? मोरे यांनी आदल्या दिवशी फरार दाखवलेला मुख्य आरोपी एक्साईजच्या छाप्यावेळी त्या ठिकाणी होता हे देखील उघड झाले. तसेच, मोरे यांनी जागा मालकाचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचाही आरोप झाला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका निर्माण झाली. या सर्व प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही चर्चा रंगली.
आमदारांनी दाखल केली लक्षवेधी
अखेर, ग्रामीण पोलीस ठाण्यातील बेबंदशाही बद्दल नागरिक तक्रारी मांडू लागल्यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी याबद्दल पोलीस अधीक्षक, महासंचालक, गृहमंत्री यांना पत्र लिहिले. तसेच, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कार्यवाही करत मोरेंची अंबाजोगाईतून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोरे यांच्या निलंबनाची घोषणा केली.
बीडमध्येही वादग्रस्त कारकीर्द
वासुदेव मोरे यांची यापूर्वीची बीड शहर येथील कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली आहे. १३ मे २०२० रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन शिथिल असताना व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. यावेळी मोरे यांनी दुकानात घुसून व्यापाऱ्यांना विनाकारण मारहाण केली. त्यामुळे बीड शहरातील व्यापाऱ्यांनी बंद होता. या प्रकरणात मोरे यांची उचलबांगडी करून औरंगाबादला बदली करण्यात आली होती.