चारित्र्यावर संशय; पत्नीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:19 AM2019-02-10T00:19:14+5:302019-02-10T00:21:30+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
माजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पतीला पोलिसांना एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.
उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. दोन वर्षांपूर्वी ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच एका जिनींगमध्ये दोघांनाही काम मिळाले. सुरूवातीचे काही दिवस सुखाने गेल्यानंतर पती गणेश हा उषाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे दोघांमध्ये अनेकवेळा कडाक्याचे भांडण झाले. मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून शुक्रवारी रात्रीही यातूनच त्यांच्यात वाद झाले. शनिवारी पहाटेच उठून गणेश दारू पिण्यासाठी गेला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास तो परत आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाले. याचवेळी त्याने उषाचा गळा दाबला. यामध्ये जमिनीवर कोसळली यातच ती गतप्राण झाली. मात्र, ती जिवंत असल्याचे समजत तो दीड वर्षाच्या मुलाला घेऊन बाजूला राहणारा मेहुणा सुनील मोरे यांच्याकडे गेला. त्यांच्या घरी मुलाला ठेवून तो पसार झाला. मुलगा रडायला लागला आणि खूप वेळा झाला तरी त्याला घ्यायला कसे कोणीच आले नाही, म्हणून मोरे हे ढवळे यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना उषा मयत झाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करीत माजलगाव शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान व त्यांच्या टिमने तात्काळ धाव घेतली. मोरेकडून माहिती घेत गणेशच्या मागावर पोलीस धावले.
तासाभरातच शहराजवळीच एका धाब्यावर दारू पिताना त्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मेहुणा मोरे यांच्या फिर्यादीवरून गणेश ढवळे विरोधात माजलगाव शहर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोनि सय्यद सुलेमान हे करीत आहेत.
दारूच्या नशेत केला खून
गणेशला दारूचे व्यसन आहे. दिवसभर काम केल्यानंतर तो रात्रीच्यावेळी दारू प्यायचा. यामुळे उषा व गणेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री किरकोळ वाद झालेला राग मनात धरून शनिवारी सकाळी गणेशने दारूच्या नशेत उषाचा काटा काढल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.